फोंडाघाटच्या मनस्या फाले चा दिल्ली येथील ऑल इंडिया स्थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग (नेमबाजी) स्पर्धेत सुवर्णवेध ! नॅशनल पातळीवर सुवर्णपदकाला गवसणी —

सिंधुदुर्ग चा झेंडा दिल्लीवर फडकला !

” तुझ्या यशाचे दीप सदैव उजळू दे  |”

फोंडावासियांकडून मनस्याचे सर्वत्र कौतुक !

फोंडाघाटच्या इतिहासात त्रिवेणी सुवर्णयोग !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट आणि सिंधुदुर्गच्या इतिहासात, सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा त्रिवेणी योग फोंडाघाट ग्रामस्थानी अनुभवला. बाजारपेठेतील श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह  जागरचा शुभारंभ,अमृत महा आवास अभियानात, ग्रामीण विभागात फोंडाघाट ग्रामपंचायती ला द्वितीय /तृतीय पुरस्कार आणि मनस्या फालेचा सुवर्णवेध ! यामुळे फोंडाघाट पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत असून उत्साहाचे वातावरण आहे …

फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूल, मधील इयत्ता नववीची एनसीसी कॅडेट कुमारी मनस्या निलेश फाले हिने ऑल इंडिया स्थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग नेमबाजी मध्ये अचूक लक्षवेध करत नॅशनल पातळीवर सुवर्णपदक मिळवून आपले कौशल्य पुन्हा एकदा सिद्ध केले. त्यामुळे केवळ गाव – तालुका नव्हे तर सिंधुदुर्ग चा झेंडा दिल्लीवर फडकवून आपल्या जिल्ह्याचे नाव तिने उंचावले आहे.ओरोस- कोल्हापूर- अमरावती येथील गाळण प्रक्रियेतील असंख्य अडथळे पार करत, जिद्दीने आणि परिश्रमपूर्वक तिने अमरावती वरून दिल्लीची स्पर्धा पार केली. आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.त्याबद्दल तेथील एनसीसी ऑफिसर आणि स्टाफ कडून तिला सुवर्णपदक व ट्रॉफी देऊन विभागाला गौरविण्यात आले …

या खडतर प्रवासात तिला ५८, एनसीसी बटालियन प्रमुख कमांडो ऑफिसर दिनेश दयाळ शर्मा, एओ कर्नल तनुज मंडीलीक,सुभेदार मेजर कुलदीप सुधाकर, सर्व पीआय स्टाफ तसेच प्रशालेच्या आर्या भोगले, एम.डी. लाड,अजिंक्य पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच संस्थेचे पदाधिकारी व संचालक आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी मनस्याचे व मार्गदर्शक शिक्षकांचे त्रिवार अभिनंदन केले आहे… 

अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीवर मात करत, पालकांच्या प्रोत्साहनातून अन् मार्गदर्शक शिक्षकावर निस्सिम विश्वास ठेवत,गेल्या दोन महिन्याच्या खडतर प्रवासात, जिद्द – निष्ठा आणि परिश्रम यावर लक्ष केंद्रित करून,मनस्याने सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याला शूटिंग (नेमबाजी) मध्ये वेगळे परिमाण मिळवून दिले आहे. तिच्या यशाबद्दल त्यांच्या वाडीसह,पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या दिल्लीवरून आगमनाची सर्वजण वाट पाहत आहेत..

error: Content is protected !!