करूळ घाट मार्ग वाहतुकीसाठी खुला; धोकादायक दरडी काढण्याचे काम पूर्ण

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे काम अंतिम टप्प्यात पुर्ण करण्यात आले असून शनिवार दिनांक १३ सप्टेंबर पासून पूर्वत वाहतूक सुरू करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी वाहतूक सुरु करणेबाबत आदेश काढला आहे. त्यामुळे गेले नऊ दिवस बंद असलेली तरेळे-कोल्हापूर मार्गांवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत झाली आहे. वाहन चालक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

करूळ घाटात दिनांक 4 सप्टेंबर रोजी गगनबावड्यापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर यु आकाराच्या वळणावर दरडीचा महाकाय भाग रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर पडलेली ही दरड काढत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडीला तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे या धोकादायक कधीही कोसळतील असा दरडीचा भाग काढल्याशिवाय वाहतूक सुरू करणे धोक्याचे होते. या दरडी काढण्यासाठी पाच-सहा दिवसाचा कालावधी अपेक्षित होता. त्यामुळे या घाटमार्गातील वाहतूक १२ तारीख पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

दरम्यान करूळ घाटातील या धोकादायक दरडींचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तज्ज्ञ  समितीकडून पाहणी करण्यात आली. या तज्ज्ञ समितीने संपूर्ण घाटाची पाहणी केली. यानुसार  पाच ते सहा ठिकाणी अशा प्रकारच्या धोकादायक दरडी  निश्चित केल्या. त्यानंतर या धोकादायक दरडी काढण्यासाठी या कामात पारंगत असलेल्या छत्रपती संभाजी नगर येथील एस. एस. पी. एल. कंपनीला बोलवण्यात आले होते. या कंपनीने गेल्या शनिवारपासून धोकादायक तडे गेलेल्या दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कुशल मनुष्य बळ वापरून या दरडी काढण्यात येत आहे. डोंगरावर सुमारे ५० ते ६० फूट उंचावर दोरखंडाच्या साहाय्याने जाऊन या दरडी काढण्याचे अतिशय जोखमीचे काम करण्यात आले. गेले पाच सहा दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे हे काम लवकर पूर्ण करता आले. शुक्रवारी दरडी काढून पूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी घाट मार्गातील वाहतूक १३ सप्टेंबर पासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!