कोल्हापूर शहरातील उपनगरात गँगवारची पाळेमुळे पसरत आहेत
कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी उपनगरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या हत्येच्या घटनेमुळं परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. फुलेवाडी परिसरातील गंगाई लॉनजवळ मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या घटनेत सराईत गुन्हेगार महेश शिवाजी राख याचा पाठलाग करून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणात गँगवारची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हद्दपारची शिक्षा भोगलेल्या गुन्हेगाराची हत्या फुलेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री हद्दपार असलेल्या महेश शिवाजी राख यांच्यावर आरोपींनी पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार केले. या हल्ल्यात महेश राख गंभीर जखमी झाला. यानंतर सर्व हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात महेश राखसोबत असलेला विश्वजीत फाले हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत महेश राख हद्दपारची शिक्षा पूर्ण करून नुकताच शहरात दाखल झाला होता. शहरात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याची हत्या झाली. याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
धारदार शस्त्रांचा वापर करत महेश राखवर हल्ला : शुक्रवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर करत महेश राखवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात महेश राखचा जागीच मृत्यू झाला.यावेळी हल्ले खोरांनी महेश याच्या मित्रावरही हल्ला करून त्याला जखमी केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.











