भाजप कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांचे विशेष प्रयत्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : आर्थिक दुर्बल घटकातील देवगड तालुक्यातील तिर्लोट या गावच्या रहिवाशी असलेल्या प्रमिला मोंडे वय – ६० वर्षे या महिला रुग्ण गेली बरेच महिने हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होत्या. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते व भाजपा उत्तर पश्चिम जिल्हा मुंबई सचिव नामदेव चव्हाण यांना मिळताच त्यांनी तातडीने मुंबई येथील नानावटी हॉस्पिटल मध्ये श्रीम. मोंडे यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, देवगड तालुक्यातील तिर्लोट गावच्या रहिवाशी असलेल्या श्रीम. मोंडे या हृदय विकाराच्या आजाराने त्रस्त होत्या. मात्र या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांचेकडे पैसे नव्हते. ही बाब त्यांच्या मुलाने सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांच्या कानावर घातली. श्री. चव्हाण यांनी तातडीने मुंबई येथील नामांकित नानावटी हॉस्पिटल मध्ये भरती करून सुमारे ६ लाख रुपये खर्चाची नाजुक हृदय विकाराशी संबंधित बायपास शस्त्रक्रिया करून श्रीम. मोंडे यांना जीवनदान दिले. आता त्यांची तब्येत ठीक असून मोंडे कुटुंबियांच्या वतीने मुंबई येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात नामदेव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
आजपर्यंत अनेक रुग्णांना श्री. चव्हाण यांनी आधार दिला असून महागड्या हॉस्पिटल मध्ये त्यांचेवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्रातील विशेष करून कोकणातील गोर गरीब गरजवंत जनतेच्या आरोग्य साठी काम करत असून “जीवनदान हे श्रेष्ठदान” असून याचा फायदा प्रथम आपल्या कोकणातील लोकांना मिळावा हा आपल्या उद्देश असून याही पुढे आपण असेच काम करत राहणार असल्याचे यावेळी नामदेव चव्हाण यांनी सांगितले.










