निष्ठा आणि कठोर मेहनतीने आपण यश सहज मिळू शकतो – मनस्या फाले

फोंडाघाटमध्ये राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनस्या फाले हिचे जल्लोषात स्वागत

अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठीशी संस्था राहिल – संजय आग्रे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दिल्ली येथील ऑल इंडिया सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने सिंधुदुर्गातील न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची इयत्ता नववीतील एनसीसी कॅडेट मनस्या फाले हिने सुवर्णपदक मिळविल्यानंतर तिचे फोंडाघाटमध्ये आगमन होताच घरी आनंद व्यक्त करण्यात आला. दुसऱ्या दिवशी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी या संस्थेकडून आणि त्यांच्या संलग्न विभागाकडून एसटी स्टँड ते हायस्कूल बाजारपेठ मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली. उघड्या जीपमधून काढलेल्या या मिरवणुकीत दिल्ली येथे मिळवलेले सुवर्णपदक आणि ट्रॉफीसह मनस्या, एनसीसी मार्गदर्शक शिक्षक आर्या भोगले व एम.डी.लाड, अजिंक्य पोफळे, वडील निलेश फाले इत्यादी सहभागी होते. तर गाडीच्या मागेपुढे एनसीसी कॅडेटस, शाळा आणि महाविद्यालयातील मुला-मुली उपस्थित होते. मनस्याच्या विजयी घोषणांनी आणि ढोल – ताशाच्या आवाजाने बाजारपेठ दणाणून गेली होती. एसटी स्टँडवरील आणि मुलांच्या हातातील अभिनंदनाच्या आणि स्वागताचे फलकामुळे प्रत्येक फोंडावासीयांना अभिमानास्पद वाटत होते.

एसटी स्टँडवरून राधाकृष्ण मंदिरकडे मिरवणूक येताच मनस्या, शिक्षक, संचालकांनी राधाकृष्ण, गणपतीचे दर्शन घेऊन यशासाठी सांगणे केले. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त मनस्याचा श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य समाज आणि बालगोपाळ मंडळातर्फे श्रीफळ, शाल, गुलाब पुष्प आणि राधाकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बाजारपेठेतून मिरवणूक हायस्कूल परिसरात पोहोचल्यानंतर, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, न्यू इंग्लिश स्कूल आणि महाविद्यालयातर्फे मनस्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. निष्ठा, अचूक लक्ष आणि कठोर परिश्रम घेतल्यास माझ्यासारखे यश मिळविणे कठीण नाही, असे म्हणत मनस्या फाले हिने मनोगत व्यक्त केले. प्रत्येक विभागात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींच्या पाठीशी संस्था कायम राहील तसेच माझेही या मुलांना सहकार्य असेल, असे संचालक संजय आग्रे यांनी स्पष्ट करून, मनस्याचा गौरव केला. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक वर्ग, एनसीसी कॅडेट व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!