गुगल सर्चच्या द्वारे मानसिक रुग्णाची तीन दिवसांत घरवापसी
खारेपाटण (प्रतिनिधी) : झारखंड राज्यात सिमडेगा जिल्ह्यातील कोलेबिरा तालुक्यात मु.बिरवाडी (ग्रामपंचायत डोमटोली) हे गाव आहे. येथील रहिवासी असलेल्या प्रेमचंद गुडिया (वय-32) या मानसिक आजारी युवकाचे कुडाळ येथील संविता आश्रमामधून नुकतेच यशस्वी कुटुंब पुनर्मिलन घडवून आणण्यात आले आहे. दरम्यान प्रेमचंद याचे मेहुणे नोवेल बागी आणि एक नातलग जोजो यांनी संविता आश्रमात येऊन त्यांना सुखरूप घरी नेले.
याबाबत अधिक वृत्त असे की, दि. ११ सप्टेंबर, २०२५ रोजी रात्री कुडाळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून प्रेमचंद गुडिया यास संविता आश्रमात दाखल करण्यात आले होते. गोव्यात मित्रांबरोबर रोजगारासाठी जात असताना प्रवासादरम्यान राजापूर रेल्वे स्थानकावर त्याची मित्रांपासून ताटातूट झाली होती. नंतर कुडाळ तालुक्यातील नेरूर चौपाटी परिसरात तो निराधार व मानसिक आजारी अवस्थेत आढळून आला. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने व विनंतीवरून पोलिसांनी त्याला तात्काळ संविता आश्रमात सुरक्षितता आणि आश्रयासाठी दाखल केले होते.

या पार्श्वभूमीवर बोलताना जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी म्हटले की “नेरूरचे नागरिक व पोलीस अधिकारींनी परराज्यातील मानसिक आजारी व निराधार बांधवाबाबत अत्यंत मोलाची भूमिका निभावली. नागरिकांनी असाच पुढाकार घ्यावा. आपण सगळे मिळून निराधार, वंचितासाठी हे जग समाजातील सुरक्षिततेचे व आनंदाचे करूया,” असे त्यांनी म्हटले.
प्रेमचंद गुडियाच्या गाव आणि कुटुंबीयांचा तपास जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी तांत्रिक साधनांचा वापर करून केला. गुगलच्या माध्यमातून माहिती घेवून त्याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर प्रेमचंद गुडिया याचा व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांशी संवाद साधून पुनर्मिलनाचा मार्ग मोकळा झाला. कोलेबिरा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी याकामी चांगले सहाय्य केले.
संविता आश्रमातील सेवा कार्यकर्त्यांनी प्रेमचंदच्या वास्तव्यादरम्यान त्याची सर्वतोपरी काळजी घेतली व योग्य औषधोपचार, भोजन आणि मानसिक आधार दिला. हा पुनर्मिलनाचा प्रसंग एक सकारात्मक उदाहरण आहे की, समाजातील सजग नागरिक, पोलीस यंत्रणा आणि सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून एखाद्या मानसिक आजारी व्यक्तीचे आयुष्य नव्याने कशाप्रकारे उजळू शकते याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे समाज माध्यमांत बोलले जात आहे.













