डॉ.सुरज कुरणे यांचे ग्रामस्थांनी केले स्वागत
खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे असलेले मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला एम. बी. बी. एस. डॉक्टर मिळावा म्हणून ग्रामस्थांनी केलेल्या मागणी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. प्रा.आ. केंद्र खारेपाटण येथे नुकतेच एम. बी. बी. एस. वैद्यकीय पदवी धारक असलेले डॉ.सूरज बापू कुरणे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून हजर झाले असून खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच व भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, शिवसेना उबाठा कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रा.पं. सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, सुरेश गुरव, खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम आदी पदाधिकारी व ग्रामस्थ यांसह आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

खारेपाटण प्रा.आ. केंद्र येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, देवगड यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गावामधील नागरिक आरोग्य तपासणी करिता येत असून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर अगदी जवळ असलेले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव प्रा.आ.केंद्र असल्यामुळे येथे अपघातग्रस्त रुग्ण रात्री अपरात्री केव्हाही येत असतात. तसेच ग्रामीण भागातील सर्पदंश झालेले रुग्ण देखील येथे उपचारासाठी येत असल्याने खारेपाटण प्रा.आ. केंद्रासाठी एम. बी. बी. एस. कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज होती. याकरिता ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यातच शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आपली मागणी सरकारच्या व संबधीत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
या सर्व आरोग्य विषयी बाबींची व ग्रामस्थांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंगवले यांनी खारेपाटण प्रा.आ. केंद्रासाठी एम. बी. बी. एस. डॉक्टर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे देखील खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.












