रस्त्यांचा दर्जा तपासणार; गुणवत्तेशी तडजोड नाही!
कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी येत्या आठ दिवसांत मिशन मोडवर कार्यसूची तयार करून काम करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, त्यांची गुणवत्ता आणि दर्जा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कसून तपासला जाणार आहे, अशी ठाम ग्वाहीही त्यांनी दिली. महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडिक, प्रशासक के. मंजूलक्ष्मी, माजी गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सत्यजित कदम, आदिल फरास, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण निर्देश :
1 विकासाची ब्ल्यू प्रिंट: शहरातील विकासकामांचा सविस्तर अजेंडा तयार करून सोमवार, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आदेश.
2 पाणीपुरवठ्याची चौकशी: गणेशोत्सवादरम्यान पाणीपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी संबंधित कंपनी आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश प्रशासकांना दिले.
3 फुलेवाडी दुर्घटना प्रकरणी कठोर कारवाई: ठेकेदारांसह शहर अभियंता ते कनिष्ठ अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाईचे आदेश.
4 नागरिकांना दर्जेदार सुविधा: महापालिकेने पूर्वीच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांना उच्च दर्जाच्या सुविधा देण्याच्या सूचना.
पालकमंत्री आबिटकर यांनी शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी विविध निर्देश दिले. “कोल्हापूरच्या नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळायलाच हव्यात. कामकाजात सुधारणा करा आणि गुणवत्तेशी तडजोड होणार नाही, याची काळजी घ्या,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक मत्स्य विकास अधिकारी सुदर्शन पावसे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अंकुश पाटील आणि कोल्हापूर शहर विकास योजनेचे उपसंचालक दिलीप कदम उपस्थित होते.












