कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील ओझरम सेवा मंडळ, मुंबई या संस्थेने ओझरम पूर्ण प्राथमिक शाळा क्र. ०१ च्या प्रगतीसाठी केलेल्या कामगिरीबद्दल गोपुरी आश्रमाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सध्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेतही या शाळेत मोफत स्कूलबस सेवा, वसतिगृह, ग्रामस्थांची दक्षता समिती, ई-लर्निंग सुविधा, शाळेला कुटुंबाचा भाग मानणारी मानसिकता, स्वच्छता आदी उपक्रमांतून आदर्श शाळा उभी केली आहे. यामुळे इंग्रजी शाळेत जाणारी मुले पुन्हा या शाळेत दाखल झाली असून शिक्षक वर्गाच्या मेहनतीला समाजाकडून दाद मिळाली आहे. या सर्व गोष्टींमुळे ओझरम सेवा मंडळाने समाजासमोर शिक्षणाच्या विकासाचा एक आदर्श प्रयोग मांडला आहे.
मंडळाच्या या प्रयत्नांना दाद देण्यासाठी गोपुरी आश्रमाच्या वतीने विशेष कार्यक्रमात सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मंडळाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी भाषा अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, भाषा तज्ज्ञ डॉ. प्रकाश परब, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, संचालिका अर्पिता मुंबरकर, ऍड. संदीप निंबाळकर, ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर, गोपुरी आश्रमाचे सदस्य विनायक सापळे, संदीप सावंत यांच्यासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.
गोपुरी आश्रमातर्फे जिल्ह्यातील शाळा समित्यांनी या आदर्श शाळेला भेट देऊन शाळेच्या आदर्श उपक्रमांची माहिती घेऊन प्राथमिक शिक्षणाच्या उन्नतीसाठी प्रभावी पावले उचलावीत, असे आवाहन करण्यात आले.












