आचरा (प्रतिनिधी) : वनराई संस्था, पुणे व एच.डी.एफ.सी. बँक यांच्या संयुक्त ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत दोन दिवसीय अभ्यास दौरा दि. ८ आणि ९ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या दौर्यात प्रसिद्ध भूवैज्ञानिक डॉ. अजित वर्तक आणि वनराईचे पर्यावरण अभ्यासक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत भूविज्ञान, सागर आणि पर्यावरण संवर्धनाविषयीची आवड जागवली.
या शैक्षणिक दौर्यात दोन्ही मान्यवरांनी ज्ञानदीप विद्यालय (वायंगणी-मालवण), श्री भगवती हायस्कूल (मुंणगे), श्री रामेश्वर हायस्कूल (मिठबाव) आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा क्र. १ (देवगड) या शाळांना भेट दिली.
सागर, खडक आणि निसर्गाचा शोध
भूगोलाचा थेट अनुभव डॉ. वर्तक यांनी विद्यार्थ्यांना खडकांचे प्रकार, निर्मिती प्रक्रिया, खनिजे, जीवाश्म, तसेच समुद्रकिनाऱ्यावरील शंख-शिंपले, सागराचे आपल्या जीवनातील महत्त्व, आणि सागरी वनस्पती व जीवसृष्टी याबाबत रोचक उदाहरणांसह मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना खडक व वाळूचे नमुने दाखवत पृथ्वीच्या उत्क्रांतीची कथा जिवंत केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी त्यांच्या जिज्ञासेला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना दिली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी विज्ञान क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे, असे प्रेरणादायी संदेश दिले.
गवत, गाव आणि हरित शिक्षणः वनराईचे पर्यावरण अभ्यासक श्री. बसवंत विठाबाई बाबाराव यांनी विद्यार्थ्यांशी पर्यावरणातील बदल, स्थानिक जैवविविधता आणि शाश्वत जीवनशैली यांबाबत संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना परिसरातील गवतांच्या विविध प्रजातींचे महत्त्व, तसेच आपल्या गावातील नैसर्गिक संपत्ती जपण्यासाठी ‘गवताचे हरवेरियम (Herbarium)’ तयार करण्याचा प्रकल्प सुचवला. या उपक्रमातून मुलांमध्ये निरीक्षण, नोंदवही ठेवणे, आणि स्थानिक पर्यावरणाचे दस्तऐवजीकरण या गुणांचा विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक
मिठबाव येथील श्री रामेश्वर हायस्कूलमधील शिक्षकांनी राबविलेल्या स्थानिक पर्यावरणाशी निगडित प्रकल्पांचा आढावा घेत दोन्ही मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पनांना चालना देण्यासाठी आणि समुद्र- पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धांची घोषणा करण्यात आली.
सागर शिक्षणाचा नवा अध्याय
वनराई संस्था आणि एच.डी. एफ.सी. बँक यांच्या ‘परिवर्तन’ प्रकल्पाअंतर्गत राबविलेला हा अभ्यास दौरा ‘समुद्र शिक्षण’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये भूविज्ञान, सागरी जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाविषयी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षणाची ओळख करून देणारा उपक्रम ठरला.
या उपक्रमाला वनराईचे प्रतिनिधी निलेश तेजम, शिवराम म्हापणकर, महेश गोडे, प्रविण वायंगणकर, सिद्धेश औंधकर सोबत शिक्षकवृंद मुख्याध्यापक डी. जे. टकले, शिक्षक जाधव (वायंगणी हायस्कूल) मुख्याध्यापिका एम.बी. कुंज, शिक्षक बागवे (मुणगे हायस्कूल) मुख्याध्यापक आर. आर. राऊत, शिक्षक सावंत (मिठबाव हायस्कूल), प्राथमिक शाळा कुणकेश्वर उपशिक्षक लवटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.











