५० हून अधिक घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरांच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या

सावंतवाडीत केली चोरी; एलसीबी ने आवळली अटकेची दोरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात पाच ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना ५ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. या बाबत रघुनाथ गवस यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बी. एन. एस. कलम 62, 305, 331(4), 331(3) नुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील घरफोडी करणारे अट्टल चोरटे असलेले सख्खे भाऊ आरोपी सलीम महंमद शेख, वय 35 वर्षे, रा. महाड, गंधारपाले, साईनगर, ता. महाड, जि. रायगड सध्या रा.कळंबोली डुडीओ आणि तौफिक महंमद शेख, वय 30 वर्षे, रा. चिकोडी, संजय गांधीनगर, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक सध्या रा. बौद्धवाडी, कळंबोली यांना कळंबोली परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करिता सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे व पोलीस अंमलदार अमर कांडर यांनी केली आहे.

तक्रारदार रघुनाथ गवस (वय ६५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती की ते आपल्या पत्नीसह कामानिमित्त ईसापुर येथे गेले होते. ५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मुलगा विवेक यांनी फोन करून घराचे मुख्य दरवाजाचे लॉक कट केलेले असून दोन्ही दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली. त्यानुसार रघुनाथ गवस व त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सावंतवाडी येथे येऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडून सुमारे ५ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच ज्ञानेश्वर यशवंत पाटकर (वय 38, रा. गोल्डन बेली बिल्डिंग सर्वोदय नगर सालाईवाडा, सावंतवाडी) यांचेही 25000 रुपये घराचा कडी कोयंडा तोडून चोरी झाल्याचे दिसून आले. तसेच चंद्रकांत गंगाराम निगुडकर (वय ५९, दुर्वांकुर अपार्टमेंट, शिरोडा नाका, सावंतवाडी) आणि महेश कृष्णा बागवे (वय ५१, शिरोडा नाका, मनोदय अपार्टमेंट, सावंतवाडी) यांनीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केल्याची तक्रार नोंद केली होती. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत होते. याप्रकरणी सलीम महंमद शेख आणि तौफिक महंमद शेख यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीं विरोधात जवळपास 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. बऱ्याच जिल्ह्यात व राज्यात सदर आरोपींनी चोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. या अट्टल चोरांना पकडल्यामुळे आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!