शिपिंग कंपनी, अपना ट्रस्टतर्फे उपजिल्हा रुग्णालयास वैद्यकीय उपकरणे उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे माध्यमातून शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अपना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने सीआरएस फंडातून येथील उपजिल्हा रुग्णालयास ४५ लाख रुपयांची अद्ययावत वैद्यकीय उपरकरणे दिली गेली आहेत. या उपकरणांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योग्यरीत्या वापर करून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा द्यावी, अशी अपेक्षा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांनी व्यक्त केली.
शिपिंग कंपनी, अपना ट्रस्टतर्फे सीआरएस फंडातून उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झालेल्या वैद्यकीय उपकरणांचे रुग्णालयातील ऑपरेशन विभागात श्री. चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, हुंबरठ उपसरपंच संदीप होळकर, सहाय्यक अधिसेविका एस. एस. तिवरेकर, परिसेविका सी. आर. सावंत, नितीन सावंत, वैभव फाले, विजय चौरे, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे आदी उपस्थित होते.
डॉ. पंकज पाटील म्हणाले, या वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध मिळणार आहे. सीआरएस फंडातून अद्ययावत उपकरणे प्राप्त झालेले जिल्ह्यातील पहिले कणकवली उपजिल्हा रुग्णालय आहे. या उपकरणांमुळे जलद तपासण्या, शस्त्रक्रिया करणे सोपे होणार आहे. बायोकेमिस्ट्री अॅनालायझरमुळे प्रयोगशाळेतील तपासण्या जलद व अचूक होतील, तर लॅप्रोस्कोपिक सेट शस्त्रक्रियांमध्ये उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
या मदतीबद्दल पालकमंत्री नितेश राणे, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अपना चॅरिटेबल ट्रस्टचे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने आभार मानले. अद्यायवत वैद्यकीय उपकरणांमुळे सर्वसामान्यांना रुग्णांना उपचार घेण्याची अन्य रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार नाही. रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सीआर्म मशीन, लॅप्रोस्कोपिक सेट आणि बायोकेमिस्ट्री अॅनालायझर यासारख्या अद्यायवत वैद्यकीय उपकरणे आहेत.












