सिंधुदुर्गाची पुन्हा एकदा संगीत क्षेत्रात बाजी!

‘दाजीकाका गाडगीळ करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांना ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ पुरस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या ‘दाजीकाका गाडगीळ करंडक – राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५’ मध्ये सिंधुदुर्गातील संगीतकार जोडी चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर यांनी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत’ हा मानाचा किताब पटकावला आहे.

कलांश थिएटर, मुंबई निर्मित “मढ निघाला अनुदानाला” या एकांकिकेस परीक्षकांकडून उच्च दर्जाचे मानांकन मिळाले. सामाजिक आणि भावनिक वास्तवावर आधारित या एकांकिकेला प्रेक्षकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेत कलांश थिएटर, मुंबई समूहाने विविध विभागांत उल्लेखनीय कामगिरी करत खालील पारितोषिके पटकावली –
उत्तेजनार्थ – कलांश थिएटर, मुंबई
दिग्दर्शक उत्तेजनार्थ – महेश कापरेकर आणि सागर चव्हाण
सर्वोत्कृष्ट संगीत (प्रथम) – चिन्मय सावंत आणि सुबोध मालंडकर
सर्वोत्कृष्ट लेखक (द्वितीय) – प्रतीक चौधरी
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – श्याम चव्हाण
अभिनेता उत्तेजनार्थ – प्रसेनजीत गायकवाड

या स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, दिग्दर्शक योगेश शिरसाट आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी केले.

एकांकिकेतील प्रभावी मांडणी, ठसठशीत अभिनय तसेच संगीतकार जोडीनं दिलेलं सूक्ष्म आणि भावस्पर्शी पार्श्वसंगीत यामुळे या सादरीकरणाने स्पर्धेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

यापूर्वीही या संगीतकार जोडीनं आय. एन. टी. हिंदी आणि आय. एन. टी. मराठी या दोन्ही स्पर्धांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पारितोषिक पटकावले असून, आता ‘दाजीकाका गाडगीळ करंडक’मध्येही त्यांनी आपले वर्चस्व ठसवले आहे.

error: Content is protected !!