खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी आकाश तळगावकर याचे बॅटमिंटन स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने कोकण झोन विभाग स्तरावर घेण्यात आलेल्या विद्यापीठस्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत खारेपाटण येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकणारा विद्यार्थी आकाश अमोल तळगावकर याने घवघवीत यश संपादन केले असून मुंबई येथे होणाऱ्या पुढील सर्धेकरीता त्याची निवड झाली आहे. त्याच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

आकाश अमोल तळगावकर याचा नुकताच खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व खारेपाटण महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर यांच्या शुभहस्ते संस्था कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण हायस्कूलचे शिक्षकेत्तर कर्मचारी यशवंत रायबागकर, महाविद्यालयाचे प्रा. प्रणय माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या कोकण विभागीय विविध क्रीडा स्पर्धा संत राऊळ महाविद्यालय कुडाळ येथे दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाल्या होत्या. या सर्धेत कुमार आकाश तळगावकर याने बॅटमिंटन इनडोअर स्पर्धेत यश संपादन करून पुढील फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता त्याची जोशी बेडेकर कॉलेज ठाणे येथे दि. १५ ऑक्टोंबर २०२५ रोजी होणाऱ्या मुंबई विद्यापीठ स्पर्धेकरीता निवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेले महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आणि शिक्षक वृंद यांनी आकाश तळगावकर याचे अभिनंदन करून त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर महाविद्यालयाचे प्रा. प्रणय माने यांचे आकाश याला बॅटमिँटन स्पर्धेसाठी विशेष मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!