आमदार निलेश राणे बांधतायत राणे समर्थक जुन्या शिलेदारांची मोट

काका कुडाळकर आणि अस्मिता बांदेकर यांनी घेतली आमदार निलेश राणेंची भेट ; चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या शब्दानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा पसारा आता वाढवायला सुरुवात केली आहे. कुडाळ-मालवण विधानसभेचा गड जिंकल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत 1990 पासून सिंधुदुर्गात कार्यरत असणाऱ्या जेष्ठ अनुभवी शिलेदारांची भेट घेत त्यांची मोट बांधण्याकडे लक्ष देतानाच सिंधुदुर्गात शिवसेना वाढीसाठी कंबर कसल्याचे मागील काही दिवसांत प्रकर्षाने दिसून येत आहे. माजी आमदार राजन तेली यांनी आमदार निलेश राणेंच्याच माध्यमातून पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आणि उबाठा सेनेची मशाल सोडली. तेली यांच्या दसऱ्याला झालेल्या शिवसेना पक्षप्रवेशाला 10 दिवस होत नाहीत तोवर कुडाळमध्ये आमदार निलेश राणेंची भेट घेत चर्चा करताना माजी जि. प. अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर, जिल्हा परिषदच्या माजी सभापती अस्मिता बांदेकर यांचा फोटो दिसून आला आहे. या फोटोत माजी आमदार राजन तेली हेही आहेत.

राजन तेली असो अथवा काका कुडाळकर आणि अस्मिता बांदेकर हे तिन्ही राजकारणी पूर्वाश्रमीचे राणे समर्थक आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे शिलेदार म्हणून तिघांचीही राजकीय कारकीर्द गाजली होती. अस्मिता बांदेकर ह्या अलीकडे सक्रिय राजकारणात नसल्या तरी त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. तर काका कुडाळकर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काका कुडाळकर आणि अस्मिता बांदेकर यांनी आमदार निलेश राणे यांची राजन तेली, संजय पडते यांच्या उपस्थितीत घेतलेल्या भेटीमुळे आता काका कुडाळकर आणि अस्मिता बांदेकर सुद्धा शिवसेनेत सक्रिय होणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

error: Content is protected !!