तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे ता. कणकवली येथे प्रशालेचे संस्थापक सन्माननीय वामनराव महाडिक उर्फ आप्पा यांचा 26 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळा स. सदस्य शरद वायंगणकर, निलेश सोरप, प्राचार्य अविनाश मांजरेकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमावेळी संस्थापक वामनराव महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
आप्पांनी केवळ शैक्षणिक संस्था उभी केली नाही, तर समाजात शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यांचे स्वप्न होते की प्रत्येक मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रकाशाने उजळून निघावा. आज त्यांच्यामुळे आमच्या भागात शिक्षणाचा पाया मजबूत झाला आहे.
संस्थापकांच्या या कार्याचा आम्हा सर्व सदस्यांना अभिमान आहे. त्यांच्या आदर्शातून आम्हाला प्रेरणा मिळते की शिक्षण हे केवळ ज्ञान देण्यासाठी नसून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आहे, असे मनोगत सदस्य शरद वायंगणकर यांनी केले.
आजच्या स्मृतीदिनानिमित्त आम्ही त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या आदर्शांवर चालत शाळेची प्रगती अधिक उंचीवर नेण्याचा संकल्प करतो. संस्थापकांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रगतीचे मोठे स्वप्न पाहिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आज आपली शाळा या भागात एक आदर्श शिक्षणसंस्था म्हणून उभी आहे. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, समर्पण आणि शिक्षणावरील नितांत प्रेम यांचे प्रतीक होय.
आपण सर्वांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्याप्रमाणे प्रामाणिकपणे कार्य करण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करायला हवा असे उद्गार प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी काढले.
यावेळी आप्पांच्या कार्याचा आढावा घेणारी एक डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली यामध्ये आप्पांच्या सर्व गुण संपन्न तेचे दर्शन घडले. कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांना प्रशालेमार्फत लाडू वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे सहा. शिक्षक सचिन शेटये यांनी मानले.












