इच्छुकांचा झाला हिरमोड तर नव्या उमेदवारांची झाली धावपळ सुरू
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे अनेक पारंपरिक मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांचा मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे पुरता हिरमोड झाला आहे. तर नव्या इच्छुक उमेदवाराची प्रत्येक मतदारसंघात भाऊगर्दी वाढण्याबरोबरच सीट मिळविण्यासाठी सध्या सर्वत्र धावपळ सुरू झाली असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी) करीता जाहीर झाला असून याबरोबरच खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात मोडणारे खारेपाटण व तळेरे हे दोन पंचायत समिती मतदार संघ सर्वसाधारण म्हणून जाहीर झाले आहेत. यामुळे इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला असला तरी पर्यायी व सुरक्षित मतदार संघ शोधण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. तर नव्याने उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना सुद्धा एक प्रकारची संधी चालून आली असल्यामुळे आपल्याच पदरात सीट कशी पाडून घेता येईल, यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड सुरू आहे. मात्र निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची असणारी भूमिका तसेच युती आणि आघाडी यांची मोर्चेबांधणी याचा सुद्धा उमेदवारी निवडीवर परिणाम होणार आहे.
खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ ओबीसी महिलेकरीता राखीव झाल्याने संभाव्य उमेदवार म्हणून सत्ताधारी भाजप पक्षात महिला कार्यकर्त्यांची चढाओढ पहायला मिळेल तर विरोधी पक्षांना उमेदवार शोधावे लागतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. मात्र खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ सर्वसाधारण झाल्याने इथे सगळ्याच राजकीय पक्षांचे उमेदवार उभे राहण्यास इच्छुक असून अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत उभे राहण्याची दाट शक्यता असल्याने आतापासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागले असल्याचे समजते.
दरम्यान खारेपाटण जि.प. मतदार संघ ओबीसी महिलाकरीता राखीव झाल्याने भाजप पक्षाकडून खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ सर्वसाधारण झाल्याने भाजप पक्षाकडून खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत हे निवडणुकीकरीता उभे राहणार असल्याचे समजते. तर शिवसेना शिंदे गटाकडून तालुका प्रमुख मंगेश गुरव आणि उबाठा शिवसेना पक्षाकडून तालुकाप्रमुख महेश कोळसुलकर यांची नावे चर्चेत आहेत. याबरोबरच तळेरे पंचायत समिती मतदार संघदेखील सर्वसाधारण झाल्याने भाजप तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत तर सन २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघ निवडणुकीत खारेपाटण जि.प. मतदार संघातून भाजप पक्षाचे रवींद्र उर्फ बाळा जठार हे निवडून आले होते व त्यांनी जि.प. बांधकाम व वित्त सभापती पद देखील सांभाळले होते. तसेच खारेपाटण पंचायत समिती मतदार संघातून भाजप पक्षाच्या तृप्ती माळवदे या निवडून आल्या होत्या. मात्र सध्याचे मतदार संघातील पडलेले आरक्षण पाहता माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार व माजी पं.स. सदस्या तृप्ती माळवदे यांचा पत्ता कट झाला आहे. याबरोबरच तळेरे पं.स. मतदार संघातून माजी पं.स. सदस्य व सभापती दिलीप तळेकर यांना पुन्हा एकदा उभे राहण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. युती आणि आघाडीच्या घमासानात येणाऱ्या काही दिवसातच खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील व पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.












