चाळीस वर्षानंतर प्रशाला कुमारभवन, भुदरगड येथे विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर आणि मज्जा मस्तीसह मदतीचे सुद्धा आश्वासन ऊर्जादायी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मैत्रीच्या दुनियेत निखळ आनंद आणि भावी आयुष्य जगण्याची ऊर्जा व मन मोकळेपणाचा विरंगुळा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे स्नेहमिलन अर्थात गेट-टुगेदर! नावातच एकत्र येऊन, त्या विश्वात विहार करण्याचे साधन! अर्थात या गोष्टी कुणाला नको असतात? सर्वजण आसुसलेले – दहावी /बारावी माध्यमिक शिक्षण झाले, निकाल लागला की, प्रत्येकाच्या वाटा करिअर ओरिएंटेड होतात आणि काही संसाराच्या, काही आपला देश सोडून परदेशात, काही राज्य – गाव सोडून पैशाच्यापाठी सुखाच्या शोधात पळत असतात. पण एका ठिकाणी एका वळणावर आठवण होते, ती आपल्या शाळेतील मित्रांची! मग ओढ लागते. समस्या, संकट, अडचणीवर मात करत आयुष्याच्या उतारावर मित्रपरिवार एकत्र येतो. यालाच गेट-टुगेदर किंवा स्नेह सोहळा म्हणतात.
अशीच फोंडाघाट मधील एक शितल तेलंग, आत्ताची सुचिता हळदीवे या मैत्रिणीला सुमारे ४० वर्षांपूर्वी, माहेरी शिकलेल्या, कुमारभवन करडवाडी, भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील, आपलं गेट-टुगेदर, वर्ग मित्र सोहळ्याची ओढ लागली. कामावरून परवानगी घेऊन हुशार शितलने फोंडाघाट ते राधानगरी, पतीच्या मोटारसायकलने, निपाणी ते करडवाडी असा सुमारे साडेसात तासाचा कंटाळपणा प्रवास केला. पोचली सोहळ्यासाठी! स्नेहसोहळा आनंदात उत्साहात संपन्न झाला. परत सासरी आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह ओसंडत होता. वर्गातील रणजीत पाटील नावाचा मुलगा अमेरिकेत असतो. तो गावाला येणार म्हटल्यावर, इतर सर्व मुलांनी गेट-टुगेदर ठरविले. फोन, व्हाट्सअप, सोशल मीडियामुळे सर्वच तयार झाले. कोणी शहरात, कोणी चांगल्या नोकरीत, कोणी नेव्हीत ऑफिसर, तर कोणी उद्योग धंद्यामध्ये आपले नाव कमवीत होता. मात्र त्या ग्रामीण भागात आम्ही मुली घरीच बसलो होतो किंवा संसारात रमलो होतो. इतक्या लांबून मी येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. तरीही लांबून आपल्या नोकरी उद्योगातून ओढीने सगळे एकत्र आलो होतो. मी वर्गात हुशार असल्याने सर्वांनीच माझं कौतुक केलं आणि स्नेहांनी यथोचित सत्कारही केला. सगळ्यांना भेटून आनंद झाला आणि “सुख म्हणजे नक्की काय असतं ?” याचा साक्षात्कार झाला. निरोप घेताना सर्वांचीच पावले जड झाली. परंतु संसाराचे, कर्तव्याचे ओझे थांबूच देईना. मित्र परिवारांनी आम्हा भगिनींना मैत्रीचा विश्वास देताना, तुमची मुले आता शिकत आहेत. कसलीही अगदी आर्थिक मदत लागली तर मित्र या नात्याने हक्काने कळवा. आम्ही नक्कीच मदत करू! हा शब्द ऊर्जा देऊन गेला.
अति ग्रामीण भागातील हे विद्यार्थी – विद्यार्थिनी आपण कितीही मोठे झालो, पण आपल्या मित्र-मैत्रिणी प्रति मदतीचा हात? हा विचारच आजच्या भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारा आहे.












