सावंतवाडीत 80 किलो गोमांस पकडले ; दोघांना अटक

पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची मोठी कारवाई

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी नगरपरिषद क्षेत्रातील एका घरात गोवंश मांस साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आज दणका देत मोठी कारवाई केली. या धाडीत ८० किलो गोवंश सदृश्य मांस, मोठा फ्रीझर, वजनकाटा, मांस कापण्याचे हत्यार व प्लास्टिक पिशव्या असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सरफराज भाऊद्दीन खाजा (वय ४५) आणि सनोबर भाऊद्दीन खाजा (वय ४०) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पीएसआय जयेश खंदरकर, माधुरी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १५ अंमलदारांच्या पथकाने केली.

गोपनीय माहितीनुसार संशयितांच्या नगरपरिषद परिसरातील घराभोवती पोलिसांनी काटेकोर निगराणी ठेवली. झडती घेण्याच्या वेळी घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलिसांनी जीपवरील अनाउन्स सिस्टीमद्वारे चेतावणी दिली

“आम्ही रितसर प्रक्रियेनुसार काम करत असून, दरवाजा न उघडल्यास फोडून प्रवेश करावा लागेल.”

यानंतर घराचा दरवाजा उघडण्यात आला आणि झडतीदरम्यान ८० किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस सापडले. पंचनामा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, संबंधितांविरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर ठिकाणी गांजासंबंधी माहिती मिळाल्यानेही चौकशी सुरु असल्याचे सूत्रांकडून समजते.

सावंतवाडी शहराच्या हद्दीत असा अवैध गोवंश मांस साठा उघड झाल्याने स्थानिक प्रशासन हादरले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सावंतवाडी पोलिसांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे, अवैध व्यापाराला ‘क्लीन बोल्ड’ करणारी ही कारवाई पोलिसांची धडाडी दाखवणारी ठरली आहे.

error: Content is protected !!