चोरीच्या १५ मोटर सायकलींसह एकूण १०,२५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !!

सराईत मोटर सायकल चोरटयास अटक…

मोटर सायकल चोरीचे १० गुन्हे उघड

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई !!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत एक सराईत चोरटा गजाआड केला आहे. या कारवाईत तब्बल १५ चोरीच्या मोटरसायकलींसह एकूण १० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईतून १० मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अलीकडेच वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास मोहीम हाती घेतली. तपासादरम्यान पथकातील अंमलदार प्रविण पाटील, दीपक घोरपडे व सत्यजित तानुगडे यांना माहिती मिळाली की, सराईत आरोपी अक्षय राजू शेलार हा आपल्या साथीदारांसह कोल्हापूरसह राजापूर व कुडाळ परिसरातून मोटरसायकली चोरून शाहू टोलनाका परिसरात थांबला आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकाने शाहू टोलनाका परिसरात सापळा रचून आरोपी अक्षय शेलार (वय २५, रा. इचलकरंजी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेली बुलेट मोटरसायकल वडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ४४२/२०२५ मधील असल्याचे निष्पन्न झाल्याने ती जप्त करण्यात आली.

पुढील तपासात आरोपीने त्याचा साथीदार विजय गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) याच्यासह पन्हाळा, शाहुवाडी, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, राजापूर (रत्नागिरी) आणि कुडाळ (सिंधुदुर्ग) येथून वेगवेगळ्या मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत १५ मोटरसायकली जप्त केल्या असून, चोरीच्या १० गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

सदर मोटरसायकली आरोपीने म्हसोबा माळ, गोकुळ शिरगाव येथे कौतुक शंकर कुडेकर यांच्या घराच्या परिसरात लपवून ठेवल्या होत्या. आरोपीचा साथीदार विजय गुरव याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, शहापूर ठाण्याचे निरीक्षक सचिन सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, तसेच अंमलदार प्रविण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, नवनाथ कदम, अमित सर्जे, संजय हुंबे, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे, सतिश सुर्यवंशी, प्रदिप पाटील, सागर चौगले, वडगाव ठाण्याचे आसिफ कलायगार, शहापूर ठाण्याचे आयुब गडकरी, रोहित डावळे, शशी ढोणे, तसेच सायबर पोलीस ठाण्याचे राजेंद्र ताटे, सुरेश राठोड, अमर वासुदेव, सचिन बेंडखळे यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!