खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघात महिलांची चुरस!

ओबीसी महिला आरक्षणामुळे तब्बल ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद व १०० पंचायत समिती मतदारसंघाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला करीता राखीव झाल्याने सध्या खारेपाटण मतदार संघात महिलांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. भाजप पक्षाच्या ८ तर शिवसेना उबाठा पक्षाची १ महिला उमेदवार असे मिळून खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात तब्बल ९ महिला निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत आहे.

दरम्यान खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात भाजप पक्षाच्या दोन विद्यमान महिला सरपंच निवडणूक लढविण्यास इच्छुक असून एक माजी पंचायत समिती सदस्यासह १ माजी उपसरपंच महिला व २ माजी ग्रामपंचायत सदस्य देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. याबरोबरच शिवसेना उबाठा पक्षाची १ महिला पदाधिकारी व भाजप पक्षाच्या २ महिला कार्यकर्त्या अशा मिळून खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात ओबीसी महिला राखीव प्रवर्गासाठी एकूण ९ महिला निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे समजते.

यामध्ये भाजप पक्षाकडून खारेपाटण सरपंच प्राची देवानंद ईसवलकर, वायंगणी सरपंच अस्मि प्रशांत लाड, माजी पं.स. सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण ग्रा.पं. माजी उपसरपंच रीना रवींद्र ब्रम्हदंडे, खारेपाटण ग्रा.पं. सदस्य अंजली सुधीर कुबल, उज्ज्वला विरेंद्र चिके, तसेच भाजप महिला कार्यकर्त्या कीर्ती संकेत शेट्ये व आरती अवि गाठे यांसह शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला पदाधिकारी मनस्वी महेश कोळसुलकर या ९ महिला उमेदवार खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघ हा तब्बल २५ वर्षे स्थानिक उमेदवारी पासून दूर झाला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये थोड्या फार प्रमाणात नाराजी होती. यावेळी महिला ओबीसी आरक्षण पडल्याने खारेपाटण मधील अनेक स्थानिक महिला उमेदवारांनी निवडणुकीसाठी उभे राहण्याची व निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केल्याने सर्वच राजकीय पक्षात उलथापालथ होऊन नेमकी कोणाला सीट मिळते, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!