महापुरुषांचे विचार हाच आमच्या जगण्याचा सक्सेस पासवर्ड – डी. के. पडेलकर

वैभववाडीत ६९वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे आमच्यासाठी मानव मुक्ती दिन आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हांला बुद्ध धम्म देऊन माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला आहे. महापुरुषांचे विचार आमचा श्वास आहे. तसेच तो आमच्या जगण्याचा सक्सेस पासवर्ड आहे, असे प्रतिपादन बौध्द धम्म अभ्यासक डी. के. पडेलकर यांनी व्यक्त केले. वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. पडेलकर बोलत होते. संघाचे उपाध्यक्ष संतोष कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सचिव रवींद्र पवार, माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष शारदा कांबळे, ऑल इंडिया धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, सुवर्णा यादव, स्मिता पवार, सुमन कदम, संजीवनी जाधव, योगेश सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पडेलकर पुढे म्हणाले, आंबेडकरी चळवळीचा कणा ही धम्म चळवळ आहे त्यामुळे धम्म चळवळ गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. आपली परंपरा ही वैभवशाली इतिहासाची परंपरा आहे. याची जाणीव ठेऊन आपले आपण सिंहालोकन केले पाहिजे. कोणतीही क्रांती ही विचारावर होत असते. जसे आहारामध्ये भेसळ झाली तर आरोग्य बिघडते तसे विचारांमध्ये भेसळ झाली तर समाजाचे आरोग्य बिघडण्याचा गंभीर धोका असतो. त्यामुळे ही विचारांची भेसळ सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे. जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवतो तो खरा आंबेडकरवादी होय. बाबासाहेबांच्या स्वप्नातला बौद्ध समाज हा त्याच्या आचार विचारातून दिसला पाहिजे. केवळ महापुरुषांच्या प्रतिमा पूजन चालणार नाही तर त्यांचा विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खऱ्या शत्रूंपेक्षा खोटे भक्त महापुरुषाच्या विचारांचे मारेकरी आहेत, असे त्यांनी सांगितले.   

कार्यक्रमांची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. बुद्ध पूजापाठ संघांचे बौध्दाचार्य संतोष कदम, महेंद्र यादव, सुरेंद्र यादव, मंगेश कांबळे, विश्वास पेडणेकर, यांनी केला. यावेळी समाजातील यावर्षी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी केले. यावेळी अजित कदम, धर्मरक्षित जाधव, दिलिप यादव, रुपेश कांबळे, अमर कदम यांच्यासह मोठ्या संख्येने बौध्द बांधव उपस्थित होते.

यावेळी वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे सुपुत्र प्राथमिक शिक्षक योगेश सकपाळ यांनी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी असलेली MH CET परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचा यावेळी संघटनेच्यावतीने मानपत्र, शाल, पुष्पगुछ देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!