जिल्हाधिकाऱ्यांच्या शाळा तिथे दाखला संकल्पनेचे यश
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अभिनव संकल्पनेतून सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘शाळा तेथे दाखले’ या उपक्रमाला कणकवली तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळांच्या माध्यमातून वय, अधिवास आणि जातीचे दाखले देण्याचे नियोजन महसूल व शिक्षण विभागाने संयुक्तरीत्या केले होते.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत कणकवली तालुक्यातून ८८२५ वय-अधिवास दाखले आणि ८०५ जात दाखले असे एकूण ९६३० दाखले विद्यार्थ्यांना शाळांमार्फत वितरित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या कल्पक संकल्पनेतून तालुक्यातील महसूल विभागाने जलदगतीने कामकाज पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जातीच्या दाखल्यांचे वाटप आता अंतिम टप्प्यात असून ते लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या अभियानासाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या नेतृत्वात महसूल अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, तसेच CSC आणि महा-ई-सेवा केंद्र चालक व सेतू कर्मचारी यांनी प्रभावीपणे काम केले. त्याचबरोबर शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकवर्ग यांनी मोलाचे सहकार्य दिले.
तहसीलदार देशपांडे यांनी सांगितले की, “शाळेतील शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळेच हे अभियान यशस्वीरीत्या राबविणे शक्य झाले.” या मोहिमेत गंगाराम कोकरे, मंगेश यादव, मंडले, मंगल गायकवाड, हेमलता तोरसकर, संभाजी खाडे, विलास चव्हाण, चाळके, सिंगनाथ, रणजीत चौगुले, अंकिता बागवे आणि कांबळे यांनी विशेष कामगिरी बजावली.
‘एकही पात्र विद्यार्थी दाखल्यापासून वंचित राहू नये’ या जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेचे पालक वर्ग आणि शिक्षकांनी मनापासून स्वागत केले असून या अभियानामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.










