खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे नुकत्याच पार पडल्या. या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलची विद्यार्थीनी श्रावणी सत्यवान सुतार हिने ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला असून आता तिची निवड विभाग स्तरावर होणाऱ्या मैदानी स्पर्धेसाठी झालेली आहे.
श्रावणी सत्यवान सुतारला सुरुवातीपासूनच खेळाची आवड होती. प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री. पाडवी व श्री. भिसे यांच्या विशेष मार्गदर्शनातून कुमारी श्रावणी हिने जिल्हास्तरावरील ८०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करीत विभाग स्तरावर प्रशालेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त केली आहे. तसेच जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलांच्या ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त करत यशाची घोडदौड कायम ठेवली आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त शाळेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.












