सोशल मीडियावर पोस्ट करत जनतेला दिले आश्वासन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालकमंत्री नितेश राणे यांनी या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सामाजिक माध्यमांद्वारे प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहणार असल्याचीही ग्वाही दिली आहे.
नितेश राणे यांनी आपण जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवत असल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
अवकाळी पावसानंतर अनेक भागातील भातपिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.













