भाजपाकडून की उबाठाकडून अद्याप प्रश्नचिन्ह
वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा गावचे सुपुत्र आणि डोंबिवली येथील उद्योजक सुनील नारकर हे जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. वैभववाडी तालुक्यातील कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून सुनील नारकर हे जिल्हा परिषद निवडणूक लढविणार आहेत. मात्र भाजपाकडून निवडणूक लढविणार की शिवसेना उबाठा कडून हे अद्याप प्रश्नचिन्ह आहे. सुनील नारकर हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवली येथे अत्यंत निकटवर्तीय आहेत. तर शिवसेना उबाठा चे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचेही ते स्नेही आहेत. राजकिय पटलावर एकमेकांचे विरोधक असलेल्या भाजपा आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षीय नेत्यांशी सुनील नारकर यांची जवळीक आहे. त्यामुळे हुकमी एक्का ठरणारे सुनील नारकर कोणत्या पक्षाचा झेंडा घेऊन जिल्हा परिषद निवडणूक लढविणार याचीच उत्सुकता सध्या कोळपे मतदारसंघात आहे. भुईबावडा गावचे सुपुत्र असलेल्या सुनील नारकर यांनी डोंबिवली येथील आपला उद्योग व्यवसाय सांभाळतानाच भुईबावडा दशक्रोशी भागात आपले सामाजिक कार्य चालू ठेवले आहे. भुईबावडा दशक्रोशी मध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक तसेच आरोग्य विषयक उपक्रम सुनील नारकर नेहमीच राबवत असतात. महिलांसाठी विशेष उपक्रमांचेही आयोजन मागील अनेक वर्षे करत आहेत. युवकांना संघटित करण्यासाठी क्रीडाविषयक विविध उपक्रमांना सढळ हस्ते मदत करतात. आपल्या समाजकार्यामुळे भुईबावडा दशक्रोशी आणि कोळपे मतदारसंघात आपली छाप सुनील नारकर यांनी उमटवली आहे. त्यामुळे कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लढविण्यास ईच्छूक असणारे सुनील नारकर हे कोणत्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार याचीच चर्चा सध्या कोळपे मतदारसंघात सुरू झाली आहे.












