कोकण मराठी साहित्य संमेलन आणि गोपुरी आश्रमतर्फे १ नोव्हेंबर रोजी शोकसभेचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : मराठी नाट्यसृष्टीत आणि साहित्यविश्वात आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी, नाटककार, साहित्यिक तथा ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकाचे लेखक गंगाराम (नाना) गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीसमोर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा कणकवली आणि गोपुरी आश्रम, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोकसभा शनिवार, दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ३.३० वाजता गोपुरी आश्रम, कणकवली येथे होणार आहे. या कार्यक्रमास साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गंगाराम गवाणकर यांनी मराठी भाषेसोबतच मालवणी बोलीचा अभिमान देश-विदेशात पोहोचविला. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील वास्तव, माणसातील भावविश्व आणि सामाजिक जाण प्रकर्षाने दिसून येते. अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी मराठी नाट्यविश्वात एक मानद पर्व निर्माण केले होते.
या शोकसभेला उपस्थित राहून त्यांच्या कार्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन कोमसाप शाखा कणकवलीचे अध्यक्ष माधव कदम, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, गोपुरी आश्रमाचे कार्यवाह बाळू मेस्त्री आणि कोमसापचे कार्यवाह निलेश ठाकूर यांनी केले आहे.












