महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने अनुसूचित जाती उमेदवारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (BARTI) पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी एक महिना कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नुकतीच MCED सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात नोव्हेंबर २०२५ पासून होणार असून अनुसूचित जातीतील युवक युवती, नवोद्योजकांना उद्योजकता विकासासंबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय, स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर अनिवासी स्वरूपाच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना विविध क्षेत्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योग संधी कशा शोधाव्या तसेच उद्योग कसा निवडावा व त्यासाठी लागणारे कर्ज कसे मिळवावे याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

याबरोबरच अनुदान योजना व उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास उद्योग उभारणी व व्यवस्थापन बाजारपेठ पाहणी उद्योग व्यवसायाचे निगडित कायदे व त्याची अंमलबजावणी, कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, डिजिटल मार्केटिंग प्रकल्प अहवाल, उत्पादनाच्या किमती, हिशोब पद्धती, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योजकाचे अनुभव, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी अशा विविध विषयांवरती अधिकारी वर्ग आणि तज्ञांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी या संधीचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसूचित प्रवर्गातील महिला पुरुष व युवक युवती उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनी फायदा घ्यावा.

या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्ष असून कमीत कमी आठवी पास शिक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. तर या प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, शालेय गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असून जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीइडी सिंधुदुर्ग द्वारा, जिल्हा उद्योग केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय, ए विंग, दुसरा मजला सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष भेटावे असे कळविण्यात आले आहे.

तर या प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे त्वरित संपर्क साधावा व आपला कागदपत्रांसह अर्ज भरून घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, MCED सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांनी केले आहे. ज्यांना या प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे त्या उमेदवारांनी सुषमा साखरे, कार्यक्रम समन्वयक, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग मोबा. 7774876139 यांचेशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!