वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रनेत सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार

उबाठा सेनेचे वैभववाडी तालुका सचिव गुलजार काझी यांचा इशारा

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनाच्या ढीसाळ कारभाराचा व पालकमंत्र्याच्या दुर्लक्षाचा फटका येतील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याबाबत आपण राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून यात सुधारणा झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा सेनेचे वैभववाडी तालुका सचिव गुलजार काझी यांनी दिला आहे.

काझी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात पुढे म्हटले आहे, उंबर्डे-भूतेश्वरवाडी येथील सुंदरा शिवगण (वय २५) हिचा मृत्यू आरोग्य यंत्रनेचे गलथान कारभाराचा बळी आहे. ‘आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे निष्पाप युवतीचा बळी गेला आहे. सुंदरा शिवगण हिला मागील काही दिवसांपासून ताप येत होता. तिने उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले. परंतु तेथील डॉक्टरांनी योग्य निदान न करता उपचार केले आणि पुढील उपचारासाठी रेफर करणे गरजेचे असतानाही तसे केले नाही. तिची प्रकृती खालावल्यानंतर तिला वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र पुढे वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे १०२ रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे नातेवाईक सुंदराला खासगी वाहनातून जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेत तिचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरशी चर्चा केली असता, औषधे आणि इतर आवश्यक सामुग्रीचा मोठा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. आरोग्य यंत्रणेचा हा मूलभूत अभाव रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. यापूर्वी देखील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आठ ते दहा दिवसांपूर्वी योग्य उपचार वेळेत न मिळाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असल्याचे श्री. गुलझार यांनी निवेदनात म्हटले आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार होत नाहीत, असा आक्षेपदेखील त्यांनी केला आहे. उंबर्डेतील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी उंबर्डे येथील सुंदरा शिवगण हिला ताप येत होता. तिने ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले होते. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी योग्य निदान न करता उपचार केले. त्यामुळे मृत्यूप्रकरणी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची चौकशी व्हावी. त्याचसोबत उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही श्री. काझी यांनी केली आहे. वैभववाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेत तातडीने सुधारणा करावी अशी मागणी आम्ही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करणार आहोत. त्यानंतरदेखील जर सुधारणा झाली नाही, तर ठाकरे शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री. काझी यांनी दिला आहे.

error: Content is protected !!