अवकाळी पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान; शेतकरी हताश

वैभववाडी (प्रतिनिधी) : ऑक्टोबर महिना संपत आला तरी अवकाळी पाऊस अजून थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवारी पुन्हा दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने हाता-तोंडाशी आलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे तयार भात कापणीला विलंब होत असून शेतकऱ्यांचे गणितच विस्कळीत केले आहे. अनेक ठिकाणी भाताची शेते आडवी पडली असून ओल्या शेतात उभ्या राहिलेल्या पिकांना कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत जमीनदोस्त होतांना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.

सध्या भात कापणी अंतिम टप्यात असून या पावसामुळे कापणीला अडथळा येत आहे. तयार भात पीक आडवे झाल्यामुळे शेती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, श्रमाचे मोल शेतकऱ्यांच्या हातातून निसटताना दिसत आहे. या पावसाने जनावरांसाठीच्या वैरणीचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ओल्या गवताचे साठवण अवघड झाल्याने जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण होणार आहे. शेतकरी शासनाकडे नुकसानभरपाईसाठी मागणी करीत असून, कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. “हातात आलेलं पीक पावसाने हिरावून नेलं. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरलं,” अशी व्यथा तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वैभववाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील गावातून मोठ्या प्रमाणावर नाचणी पीक केले जाते. सततच्या पावसामुळे या नाचणी पिकाचेही पीक आडवे होऊन नुकसान होत आहे. त्यामुळे भात शेती बरोबरच नाचणी पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

error: Content is protected !!