अध्यक्ष गणपत वळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुशे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास पावसकर यांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या संस्थेने गौरी गणपती तसेच दसरा दिवाळी या सणाचे औचित्य साधून ‘लंबोदर ठेव’ योजना मर्यादीत काळाकरिता जाहीर केली होती. या योजनेमध्ये ठेवीदारांना एक वर्ष कालावधीकरिता रक्कम ठेवता येत असून या ठेवीस १०.२५ टक्के तसेच जेष्ठ नागरीकांकरिता ०.२५ टक्के अधिकाचा व्याजदर संस्थेने जाहीर केला असून या ठेव योजनेचा कालावधी दिनांक ३१/१०/२०२५ पर्यंत निर्धारीत करण्यात आला होता. मात्र या ठेव योजनेस मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहता व संस्थेच्या सभासद तसेच असंख्य ग्राहकांच्या आग्रहाखातर सदरची ‘लंबोदर ठेव’ या योजनेचा कालावधी वाढविण्यात येत असून तो दिनांक ३१/१२/२०२५ अखेर पर्यंत करण्याचा संस्थेने जाहीर केले असल्याचे अध्यक्ष गणपत बि. बळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर र. कुशे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी सांगितले.
संस्थेचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एक संस्थेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. तंत्रज्ञानाची कास धरत संस्था कोअर बँकिंग सिस्टीममध्ये काम करत आहे. संस्थेने मोबाईल ऍप, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, नेट बँकिंग, क्युआर, एसएमस अर्लट, ईनेंच, डोअर बँकिंग तसेच पासबुक प्रिंटींग या सारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर पिग्मी संकलन हे पिम्मी मशिन बरोबरच मोबाईल ऍप व्दारे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कामकाजात करून तत्पर व पारदर्शक सेवा देण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न आहे. वाढती स्पर्धा लक्षात घेता सभासदाभिमूख योजना संस्था सातत्याने राबवित आहे. सभासदांना आधुनिक दर्जेदार सोयी सुविधा मिळाल्या पाहीजेत, आपला सभासद यापासून कुठेही मागे राहता नये याकरिता संस्था युध्दपातळीवर काम करत आहे. आगामी काळात संस्थेच्या सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आचरा, रत्नागिरी जिल्हयामध्ये राजापूर व पाचल त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हयात राधानगरी व आजरा या ठिकाणी नवीन शाखा सुरू होत असून मार्च २०२६ पर्यंत रू. २०० कोटी ठेवींचे लक्ष गाठण्याचा संकल्प असून संस्थेच्या या आर्थिक घोडदौडीत संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक, कर्मचारी, अल्पबचत प्रतिनिधी तसेच असंख्य हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य व हातभार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणपत वि. वळंजू, उपाध्यक्ष चंद्रशेखर र. कुशे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी ईश्वरदास शा. पावसकर यांनी सांगितले.












