सावंतवाडी (प्रतिनिधी) : किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादानंतर दोघांनी मिळून एका युवकावर हल्ला केल्याची घटना सावंतवाडीत घडली आहे. गाडीचा दरवाजा लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांनी डस्टबिनने युवकाच्या डोक्यावर वार करत मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल मँगो परिसरातील एका कॅफेसमोर घडली.
या प्रकरणी मौहसीन शब्बीर तांबोळी (रा. कोलगाव दरवाजा, वैश्यवाडा, सावंतवाडी) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून ओंकार गावकर आणि सोहेल मुजावर (दोघेही रा. सावंतवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मौहसीन तांबोळी हे मँगो हॉटेलसमोर त्यांच्या कॅफेजवळ उभे असताना संशयित दोघे त्या ठिकाणी आले. ते गाडीचा दरवाजा उघडत असताना तो दरवाजा तांबोळी यांना लागला. याबाबत त्यांनी संशयितांना विचारणा केली असता वाद निर्माण झाला. वादाच्या दरम्यान दोघांनी मिळून डस्टबिनच्या डब्याने तांबोळी यांच्या डोक्यावर वार केला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी व हाताने मारहाण करून त्यांना जखमी केले तसेच शिवीगाळ केली.
घटनेनंतर तांबोळी यांनी रात्री उशिरा सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश जाधव करत आहेत.












