‘तो गेला’- खानोली, कुडाळ आणि मित्रपरिवारात हुरहूर; संवेदना व्यक्त
फोंडाघाट (प्रतिनिधी) : मृत्यू अटळ आहे हे कितीही मान्य केलं तरी त्यालाही एक वयोमर्यादा असतेच ना.. त्याच्या निमित्ताच्या यादीत जाणे हे दीर्घायुषी व्हा म्हणत दिलेल्या कोट्यवधी शुभेंच्छांनाही नेहमी का तोकडे पाडते ते देवालाच माहीत.. आज एका मित्राच्या जाण्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांच्या वाट्याला आलेला सून्नपणा हा मेंदूला बधीरपणा आणणारा आहे. तो फक्त खानोलीचा, किंवा कुडाळचा किंवा तो फक्त त्याच्या मित्रांच्याच वाट्याला आलेला नव्हता.. त्याला ज्याने ज्यांने ओळखले, त्या प्रत्येकासाठी आजची तिथी अबोधी बनलीय..
या मरणावर शतदा वैर करावे..
मयूर खानोलकर.. कोणालाही हेवा वाटावा अशी प्रतिभावंत जीवनशैली जगणारा आणि इतरांना जगणं कसे जगायला पाहिजे हे स्वत:च्या उदाहरणातून दाखवणारा मित्रमाणूस आज अकाली निधन पावला. सकाळी स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून मयूरचा फोटो लावला आणि निम्म्या जणांचा एकच रिप्लाय होता, कोण हा मयूर, सगळ्यांच्याच स्टेटसवर हा दिसतोय.. आणि उरलेल्या निम्म्या जणांचे रिप्लाय होते नाय रे नाय सहन होना..
तो कोण होता, त्याचा पेेशा काय होता या चौकटीला भेदलेला मयूर म्हणून मालवणी माणसाच्या अथंगपणाची समूद्रगाथा होती.. ज्याच्या ज्याच्या वाट्याला मयूर आला त्या प्रत्येकाच्या ओजंळीत त्यांने समुद्र ओतला.. त्या समुद्रातील फडफडीत बांगडे, तारली, पापलेटा ओतली, त्या समुद्राच्या बाजूला एक माडाच्या कुशीतली घरं बांधले आणि त्या घराला एक चुलीची खोली दिली. आणि त्या चुलीवरच्या दोन जागी रटमटणारी टोपाची पातेली दिली.. त्या खोलीला नळ्याला एक सूर्याची काच दिलीय आणि त्यात त्या चूलीला अखंड आशीर्वाद देणारी अन्नपूर्णा दिली.. आणि त्याच घराच्या मधल्या खोलीत अखंड तृप्त होणारी मालवणी जेवणाची पंगत दिलीय.. आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक मित्राच्या ओंजळीत मयूरने दिलेले हे एवढेस दान होते..
घरच्या जेवणावर ताव मारताना त्यांच्या गंमत शब्दात मांडणारा फक्त तोच होता. पुरुषी मानसिकतेला छेद देताना सो कॉल्ड समाजाचा बुरखा फाडताना तो कोयत्याने खाप मारायचा.. आपल्या नात्यातल्या प्रत्येकाबद्दल लिहीताना त्याच्या हातात मयूरपंख यायचे, आणि गावराठी देवादिंकाबद्दल लिहीताना तो खांद्यावर खांबकाठी मिरवायचा.. मला असलेली ही सगळी व्यसने मयूर त्याच्या लिखाणात लिहीताना बेभान व्हायचा.. आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना स्थानिक फडणवीसांची स्थानिक दिवीजा हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं कमाल लिहायचा.. माझ्यासारखा आळशी माणूस स्वताच्याच लेखाचे पॉडकास्ट करत नाही पण मला मयूरचे लेखन नेहमी पॉडकास्ट किवा रिशेअर करावसं वाटायचं.. त्याची लॉकडाऊन कथा मी त्या कोरोना काळात ऑडीओ पॉडकास्ट केली होती. आज सगळ सुनसान आहे.. असं म्हणत दरवर्षी गणपतीत कशी बाजारपेठ गजबजायची.. आणि मग एम एच झीरो वन, एम एच झीरो टू, एम झीरो थ्री, एम एच झीरो फोर, एम एच झीरो फाय, एम झीरो नाईन, एम झीरो टेन, एम एच झीरो इलेव्हन या अगा गाड्या यायच्या.. .वॉव वॉव वॉव करत… अख्या गावाला कळायचं चाकरमानी आलेय या एका दमात बोललेल्या वाक्यात मयूरने खारेपाटण ते कुडाळ गाड्यांची रिघ उभी केली होती.. त्याचे लेखन कमाल कमाल कमाल होते. पुलंच्या रांगेत बसवावा असा मालवणी लेखनाचा हा जबरदस्त कंटेंट रायटर होता !
खाण्याबद्दल प्रचंड प्रेम असणारा हा माणूस घरच्या चुलीत आणि घरच्या ताटाच्या प्रेमात होता.. कोकणच्या अस्सल खाद्यश्रीमंतीबद्दल लिहावं ते फक्त मयूरनेच.. मग ते साधे वरणभात असो वा वालीची भाजी.. तो बोलताना एकदा बोलला होता, पनवेलात ना खाणावळ घालायचीय.. हॉटेल नाय खानोलकरांची खाणावळ.. दररोज आयटम ठरलेले.. भात माशाचा कालवण भाजी पापड.. कस्टमर कोणय येवनदेत.. जेवणाचे नखरे नाय.. ताट भरलेला पूर्ण जेवन जावक होये.. खाणावळीची मजा हॉटेलात नाय रे..
मयूर तुमच्या वाट्याला कसा आला हे त्याच्या मित्रांच्या वेेगवेगळ्या उदाहरणात असेल, पण प्रत्येकाच्या वाट्याला आलेला मयूर हा श्रीमंतच होता हे त्रिकालबाधीत सत्य आहे. मागच्या विधानसभा निवडणूकीत खास मतदानासाठी पदरचे पैसे खर्च करुन जाणारे जे काही होते त्यात मी आणि मयूरही होतो. जनशताब्दीत पूर्ण डबा भरलेला होता. पण आम्ही दोघे सीट एक्सचेंज करुन एकत्र बसलो आणि जनशताब्दीचा चो पूर्ण डबा म्हैस कथेतल्या पूल देशपांडेसारखा गजालीने रंगवला होता.. सोशल मिडीयावरचा आजचे मालवणी कंटेट हा आमच्या दोघांचाही पाट्याने झेजरायचा विषय.. सो कॉल्ड मालवणी कंटेट यांच्यावर आम्ही जे काही बोलत होतो त्यावरुन सगळ्या डब्यात शांतता पसरली होती. आणि आम्ही मूर्खासारखे बडबडत होतो.. गावराठीपासून ते राजकारणातील खुटीपर्यंत सगळ्या विषयावर मनसोक्त बोललो होतो.. स्टेशन आले म्हणून फक्त गप्पा थांबल्या ..
मयूरचे आज निधन झालंय.. अनेकांना मयूर आता नसणार यापेक्षा तो अकाली गेला याचा बसलेला धक्का मोठा आहे. मयूर व्यायामाच्या बाबतीत फिट होता, त्याचा हॅप्पी इंडेक्सही कमालीचा होता. घरच्या जेवणावर प्रेम करुन ताटाचा सोहळा मांडणारा मयूर होता. जगण्या मरण्याच्या लढाईत तूम्ही मरणाशी नाही भांडू शकत.. पण अकाली मृत्यूने एक असा जीव ओढून न्यावा की आपला तो रोल मॉडेल आहे, तो परफेक्ट लिव्हींग स्टाईलवाला आयकॉन आहे.. त्याच्या हाकेत असणारी ओ देसाई अदब कायम आठवत राहील..
त्याच्या जाण्यानंतर आज कुडाळसह संपूर्ण जिल्ह्यात आज एक जो सून्नपणा आहे तो अनेकजण बोलू नाही शकत, वेदनादायी दिवसाची ही जखम सलत राहणार… उद्या सगळच विसरायचं आहे.. पण आज तो त्याचे लिहीणं, त्याचे फोनवरचे बोलणे आणि त्यापल्याडही तुम्हाला भेटलेला तो आठवत राहणार…
या पुढे श्रावण संपताना लागणाऱ्या चमचमीत ओढीत.. गणपती जाताना रिकाम्या झालेल्या घरात.. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादात, अस्सल मालवणीपणाच्या कौतूकात आणि अखंड रिकामी राहिलेल्या गजालीच्या देवघरात दोन समईच्या प्रकाशात मयूर आठवत राहील.. रडवत राहील.. अस्वस्थ करत राहील
मित्रा माझे कधीच मरणाशी भांडण नव्हते.. पण आजपासून खरचं
“या मरणावर शतदा वैर करावे”
भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा !
# ऋषी श्रीकांत देसाई











