बांदा (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीचा समोरील दुचाकी व मोटारीला धडक बसल्याने ही दुर्घटना घडली.
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन मोटारी आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. पुण्याहून गोव्याच्या दिशेने जाणारी मोटार रस्त्यावरील गतिरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारने समोरील दुचाकीला धडक दिली आणि ती पुढील मोटारीवर जाऊन आदळली.
दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून बांदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.












