सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सावंतवाडी संस्थांनच्या युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केला. त्या भाजपमधून नगराध्यक्ष पद लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र एबी फॉर्म मिळाल्यानंतर त्यांची उमेदवारी अंतिम मानली जाणार आहे. तूर्तास नगराध्यक्ष पदाचा दावा असल्यामुळे आपण हा अर्ज भरला, असे त्यांचे म्हणणे.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखम सावंत भोसले, तसेच भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. श्रध्दाराणी या सावंतवाडी राजघराण्यातील सून आहे. त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपमधून नगराध्यक्ष पद लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने तिकीट मिळवण्यासाठी त्यांचे प्रपत्र सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नंतर उशीर नको म्हणून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे सादर केला.











