सहकार सप्ताहाचा उत्साही प्रारंभ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून डिजिटल व्यवहारांना मोठे प्रोत्साहन

सहकार चळवळ मजबूत करण्याचा निर्धार : अध्यक्ष मनीष दळवींच्या हस्ते सहकार सप्ताहाचे उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक जडणघडणीत सहकाराचा फार मोठा वाटा आहे. सहकार चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सहकारातील सर्वच व्यवहारांमध्ये पारदर्शकता टिकवणे व सर्व व्यवहार शिस्तबद्ध करण्यासाठी डिजिटलायझेशनला पर्याय नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रहाने वापर करीत बँकेच्या एकूण व्यवहारापैकी ८० टक्के व्यवहार हे डिजिटल माध्यमातून सुरू केले आहेत. जिल्हा सहकार मंडळाच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी जिल्ह्यातील सहकार चळवळीतील सर्वच मंडळी नक्कीच पुढे येतील व जिल्हा बँक म्हणून आम्ही कायमच सोबत असू असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार सप्ताह शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.

१४ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा केला जात आहे. सहकारातील सर्वात मोठा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या., सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह पूर्ण जिल्हाभरात साजरा केला जात आहे. या सप्ताहाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मनीष दळवी बोलत होते. या सप्ताह सोहळ्याची सुरुवात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करुन करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आर. टी. मर्गज यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून व भारताचे पहीले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे विकास अधिकारी श्री. पांचाळ यांनी सहकार गीत सादर केले.

यावेळी पुढे बोलताना मनीष दळवी यांनी, येत्या काळात सहकार चळवळीला नक्कीच चांगले दिवस येतील व त्यासाठी लागणारी क्षमता आपल्या सर्वांमध्ये आहे असा विश्वास व्यक्त करीत जिल्ह्यात साजरा होत असलेल्या या सप्ताहास सर्व संस्था पदाधिकारी तसेच जास्तीत जास्त सहकारात काम करणाऱ्या सर्वांनी सहभाग घेऊन हा सप्ताह यशस्वी करू व सहकार चळवळ अधिक मजबूत करू असे आवाहन केले. उद्घाटनपर भाषणात आर. टी. मर्गज यांनी जिल्ह्यात रुजलेला सहकार आणि त्यामध्ये जिल्हा बँकेने बजावलेली महत्त्वाची भूमिका यावर भाष्य केले व जिल्हा बँकेचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर देशातही पोहोचले आहे असे सांगत जिल्हा बँकेने आधुनिकतेची कास धरत ही प्रगती साधली असल्याचे नमूद केले. याबाबत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचा प्रमुख विषय सहकाराची कार्यक्षमता, जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देणे हा होता. यावेळी प्रास्ताविकात सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष गजाजन सावंत यांनी सहकाराची मुलतत्वे सांगुन जिल्ह्यातील सहकाराला यापुढे निश्चित चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उपस्थित वक्ते श्री. ऐनापुरे यांनी सहकार सप्ताहाचे मूळ उद्देश व महत्त्व सांगताना सहकारांतर्गत सहकार जोपासण्यावर भर दिला. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ व त्यांच्या अडचणींवर भाष्य करीत जिल्हा निबंधक व जिल्हा बँक यांच्या मदतीने मंडळाच्या माध्यमातून सहकार चळवळ जिल्ह्यात अधिक मजबूत केली जाईल असे सांगितले. तर एम. के. गावडे यांनी सहकाराच्या देशभरातील इतिहासाला उजाळा देत कॉम्प्युटरायझेशन व त्यामुळे संस्थांच्या व्यवहारात आलेली पारदर्शकता याचे महत्व विषद केले.

या कार्यक्रमाला जिल्हा निबंधक बाळ परब, जिल्हा बँकेचे संचालक सर्वश्री विद्याप्रसाद बांदेकर, समीर सावंत, विठ्ठल देसाई, संचालिका प्रज्ञा ढवण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, विनोद मर्गज, विक्रम मुंबरकर तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!