फोंडा हायस्कूल १९९४ च्या वर्गाचे नित्यानंद बीच रिसॉर्ट व राजकोट येथे स्नेहसंमेलन उत्साहात!
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कुणी संसारात तर कुणी कार्पोरेट मध्ये, कुणी अधिकारी तर कुणी सेवक, कुणी प्राध्यापक कुणी गरिबीचे चटके खाणारा तर कोणी ऐशोआरामात लोळणाराss. पण इथे हर्ष मनात मावेना, मिळे स्मृतीला उजाळा | असा आगळा वेगळा आहे मैत्रीचा जिव्हाळा. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट १९९४ च्या वर्गाचा स्नेहसोहळा नुकताच नित्यानंद बीच रिसॉर्ट, आचरा येथील निसर्गरम्य परिसरात उत्साहात पार पडला. सुमारे ६० मित्र-मैत्रिणींनी या स्नेहमिलनाचा आनंद लुटला. सकाळी फोंडाघाट चे वेशीवरील दैवत श्रीपाचोबाला वंदन करून, सर्वजण नियोजित तोंडवली, आचरा येथील स्थानावर पोहोचले. सलग तिसऱ्या वर्षी सुमारे ३० वर्षांपूर्वी शाळेत एकत्र वावरलेले सर्वजण एकमेकांना भेटत होते.

यावेळी मनातील कुतूहल एकमेकांच्या हास्य विनोदात कधी रुपांतरीत झाले, कुणालाच कळले नाही. थोडी पोटपूजा करून विविध फनीगेम्स मध्ये सर्वजण दंग झाले. अर्थात अनेक जण मुंबई, पुणे इत्यादी शहरात स्थायिक असूनही, एकत्र जमल्यानंतर आपल्या मालवणी कोकणी बोलीभाषेचा विसर कुणालाच नव्हता, हे शिवराळ संभाषणातून अधिकच जवळीक साधत होते. शालेय जीवनातील गप्पागोष्टी आणि चेष्टामस्करीतून आपलेपणा साधत होते. दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेऊन, समोर खळाळणारा समुद्र खुणावत होता. मग त्याचा आस्वाद न घेणारी मैत्रीच कसली? संध्याकाळच्या सुखद गारव्यात आणि उबदार वाळूत लगोरी आणि क्रिकेट रंगले.
नेहमी संसाराच्या आणि साखळीबेडीत अडकलेला जीव मोकळ्या वातावरणात अधिकच लहान लहान होत होता आणि किनाऱ्यावरील धडकणारी लाट मैत्रीची वीण अधिक घट्ट करीत होती. रात्री रंगारंग फॅशन शो, नृत्य, गायनाच्या कार्यक्रमात अवलियांनी करामत तशीच असल्याचा धक्का सर्वांना दिला आणि मी पण गळून पडले. रात्री जेवणाची तृप्तीची ढेकर देऊन मित्रवर्य डॉक्टर चंद्रशेखर हळींगळे यांनी नेहमीच्या ताण-तणावावर जगण्याच्या शैलीमध्ये केलेला बदल जीवन अधिक सुखकर कसे करतो? याचे समुपदेशन प्रत्येकालाच अंतर्मुख करून गेले आणि संपलेल्या दिवसाचा आनंद कुशीत घेऊन मस्तीच्या डोहात सर्वजण झोपी गेले.

दुपारच्या दिवशी सकाळी नाष्टा आटपुन सर्वजण मालवणला राजकोटला गेले. छत्रपती शिवरायांच्या साक्षीने मैत्री दृढ ठेवण्याचा निर्धार सर्वांनीच व्यक्त केला. प्रचंड ऊर्जा मनात घेऊन परत रिसॉर्टवर आल्यावर जेवताना सगळेच भावविवश होते. निरोपाचा क्षण समीप होता. सर्वांना स्वामींची प्रतिमा आणि गोड मिठाई घेताना, सर्वांनी पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र येण्याचा निश्चय करत एकमेकांचा निरोप घेतला आणि सर्वजण आपापल्या घरी मार्गस्थ झाले. उत्कृष्ट नियोजनामुळे हा मैत्रीचा सारीपाट असाच पुढे चालू ठेवू या निर्धाराने हे दोन दिवस संस्मरणीय ठरले.













