फासकीत अडकला बिबट्या; वनविभागाने केले रेस्क्यू

​मालवण (प्रतिनिधी) : १७ नोव्हेंबर रोजी मालवण वनविभागाच्या परिमंडळात धामापूर नियतक्षेत्रातील राठीवडे (भाकरदेव) नजीकच्या मालकी जंगल भागात एका वन्यप्राणी बिबट्याला फासकीत अडकलेल्या अवस्थेतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात वनविभाग आणि ग्रामस्थांना यश आले आहे. ​राठीवडे येथील स्थानिक ग्रामस्थ सुभाष तळवडेकर यांनी सकाळी हा बिबट फासकीत अडकल्याची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक आणि ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून ​वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक आणि ग्रामस्थ यांनी अत्यंत सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने या बिबट्याची फासकीतून सुटका केली. त्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून बिबट्याची तपासणी करण्यात आली असता, तो पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे आढळल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

​बिबट हा अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक असल्याने त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार बिबट्याची शिकार करणे किंवा शिकारीचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी गुन्हेगाराला द्रव्यदंड आणि कारावासाची शिक्षा होऊ शकते. ​या घटनेच्या अनुषंगाने, आरोपींबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल आणि त्यांना रोख रक्कम स्वरूपाचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

​सदरचे बचाव कार्य मिलीश दत्त शर्मा, उपवनसंरक्षक सावंतवाडी आणि डॉ. सुनील लाड, सहा. वनसंरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. या बचाव पथकात कुडाळ ​वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण ​वनपाल सदानंद परब, नेरू​र वनपाल सुर्यकांत सावंत, धामापूर ​वनरक्षक अतुल खोत, कांदळगाव ​वनरक्षक लक्ष्मण आमले, नेरूर ​वनरक्षक सचिन पाटील, ​वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे ​याशिवाय राठीवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचाही सक्रिय सहभाग होता.

error: Content is protected !!