ग्रामस्थांच्या वतीने सावंत पितापुत्रांचा करण्यात आला सत्कार
कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. 1 चे माजी विद्यार्थी असलेले प्रसाद शिवाजी सावंत आणि विनय प्रसाद सावंत या पितापुत्रांनी शाळेच्या तीन वर्गखोल्याना स्वखर्चाने फरशी बसवून दिली. तसेच हॅन्ड वॉश स्टेशनला फरशी बसवून दिली. सावंत पितापुत्रांच्या या दातृत्वाबद्दल तरंदळे सरपंच सुशील कदम, तसेच प्रशालेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या शाळेबद्दलची कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपत शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सावंत पितापुत्रांनी स्वखर्चाने फरशी बसवून देत शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या विकासात मौलाचे योगदान दिले. तसेच शाळेच्या आवारातील मुलांसाठीच्या हॅन्ड वॉश स्टेशनला फरशी बसवली तर शाळेच्या प्रार्थना हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायी प्रतिमा प्रसाद सावंत व लक्ष्मीकांत सावंत यांच्या सौजन्याने बसविण्यात आली. या उल्लेखनीय कार्याबद्दल शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सुशील कदम तसेच मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे शाळेचा शैक्षणिक व भौतिक दर्जा अधिक उंचावेल, असे केंद्रप्रमुख शिवाजी पवार यांनी प्रतिपादन केले. तसेच तरंदळे शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.

यावेळी प्रसाद सावंत, विनय सावंत पिता-पुत्रांनी शाळेच्या विकासासाठी या पुढेही यथाशक्ती योगदान देण्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांचे हितासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे हे तरंदळे गावासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना सरपंच सुशील कदम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तसेच शाळेच्या शैक्षणिक, भौतिक विकासासाठी सध्या असलेला शिक्षक वृंद मनापासून काम करत असल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन रामचंद्र डोईफोडे यांनी केले तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुख्याध्यापक चंद्रशेखर पोकळे यांनी केले.













