खारेपाटण (प्रतिनिधी) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्युनियर कॉलेज खारेपाटण येथे जिल्हा पोलिस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले. शाळेच्या कै.चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विजय चव्हाण यांचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य संजय सानप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनातच करावी व वरिष्ठ पदावर काम करण्याची जिज्ञासा जोपासावी. तसेच सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षांचे असणारे महत्त्व त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अँटी करप्शन ब्युरो सिंधुदुर्गचे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ व त्यांचे सहकारी तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, तसेच रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष व ज्युनियर कॉलेजचे प्रा. दयानंद कोकाटे व ज्युनियर कॉलेज विभागातील सर्व शिक्षक वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल विजय पांचाळ यांचे प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.












