खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील तळेरे व खारेपाटण पंचायत समिती मतदार संघ अंतर्गत येणाऱ्या गावातील भाजप कार्यकर्त्यांची खारेपाटण विभागीय बैठक नुकतीच कणकवली तालुक्यातील वारगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे भाजप पक्षाचे कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर व भाजप वरिष्ट कार्यकर्ते संतोष कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी खारेपाटण जि. प. माजी सदस्य व माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार, खारेपाटण शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, सुधीर कुबल, राजा जाधव यांसह आजी-माजी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख, तालुका व जिल्हा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, भाजप सेल अध्यक्ष आणि सरपंच, उपसरपंच व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर विभागावर बूथनिहाय कार्यकर्त्यांसह व मतदारांचा आढावा घेण्यात आला.

“आपल्या जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही विरोधकांनी प्रतिष्ठेची केली असून भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी ही निवडणूक असून त्यामुळे आपल्याला देखील त्याच ताकदीने काम करावे लागणार आहे. तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याने जागृत राहून आपल्या गावातील शहरात राहणारे मतदार शोधून त्यांच्यापर्यंत आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा व मंत्री नितेश राणेसह भाजपची ताकद बळकट करा”, असे आवाहन यावेळी भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष कानडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. तर भाजपा कणकवली तालुका ग्रामीण मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी देखील यावेळी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कणकवली नगरपंचायत निवडणूक ही आता शहरापुरती मर्यादित राहिली नसून, संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले असून आपण सर्व कार्यकर्त्यांनी बूथ निहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी व मीटिंग घेऊन आपली निशाणी घराघरात पोहचवा आणि कणकवली नगरपंचायतीत आपल्या नगराध्यक्षसह भाजपला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना केले.













