बोगस मतदार नोंदणीचा आक्षेप
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली प्रभाग क्र. ७ मध्ये रहिवास नसलेल्या मतदारांची अनधिकृतपणे मतदार यादीत नोंदणी करण्यात आली असल्याची तक्रार आमदार निलेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली असून यात जबाबदार बिएलओसहीत संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. आमदार निलेश राणे यांनी लेखी पत्रात म्हटले आहे की, एकाच घराच्या पत्त्यावर विविध धर्मिय मतदारांची नावे निदर्शनास येतात कणकवली प्रभाग क्र. 7 मधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समिर नलावडे यांचे घर नं. 389 तसेच यांच्या पत्नी सुप्रिया नलावडे, घर नं 422 प्रभाग क्र. 7 येथे राहतात, असा उल्लेख मतदार यादीत दिसून येतो. या घरात राहत नसलेल्या दोन मुस्लिम कुटुंबिय मतदारांची नोंद त्याचप्रमाणे इतर २० मतदारांची नोंद स्वतःच्या घरात दाखविल्याचे दिसते. अशाप्रकारे मतदारांच्या गैरवापरास सर्वेसाठी असलेले बी. एल. ओ. जबाबदार आहेत. हे मतदार ज्या प्रभागात राहतात त्याच प्रभागातून त्यांनी मतदान करावे. ज्याठिकाणी २ ते ३ व्यक्ती राहतात, अशा ठिकाणी २० ते २५ मतदारांची नोंदणी झालेली असल्याचा पुरावा असल्याचे यात म्हटले आहे. तरी संबंधित बी. एल. ओ. यांची चौकशी होवून गैरप्रकार करणाऱ्या व बोगस मतदार करणाऱ्यांना तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी केली आहे.












