कुडाळ (प्रतिनिधी) : कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय, भडगाव बुद्रुक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कला व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भजन सम्राट सूर्यकांत रामचंद्र भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार शास्त्रीय संगीत वर्ग विद्यालयात सुरू करण्यात आले आहेत. उपशास्त्रीय संगीतामध्ये भजन, भक्तीगीत, भावगीत नाट्यगीत लोकसंगीत इत्यादी शिकवण्यात येते. गेली 40 वर्षे भिलारे संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबई मध्ये भावना ट्रस्ट कॉलेजमध्ये संगीत शिक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे.
या वर्गांची विशेषता म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हे माफक शुल्कात करून देण्यात आले आहेत. संगीताचे शिक्षण सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सहज मिळावे, त्यांची कलात्मक अभिव्यक्ती वाढावी आणि त्यांच्यातील सुप्त प्रतिभेला वाव मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
संगीत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, शैक्षणिक ताण कमी होतो तसेच एकाग्रता विकसित होते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याकरिता हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या संगीत क्लासच्या उद्घाटन कार्यक्रमाला भजन सम्राट श्री. भिलारे बुवा, सदानंद तावडे (संस्था सहसचिव), मधुकर पवार (माजी मुख्याध्यापक व संस्था संचालक), मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्था व विद्यालयामार्फत करण्यात आले आहे.












