“संविधान हा भारत देशाचा महान ग्रंथ” – प्राची ईसवलकर
खारेपाटण (प्रतिनिधी) : “भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली देशाची राज्यघटना अर्थात भारतीय संविधान हे आपल्या भारत देशाला मिळेलला महान ग्रंथ आहे.” असे भावपूर्ण उदगार सरपंच प्राची ईसवलकर यांनी खारेपाटण पंचशील नगर येथील बुद्धविहार आयोजित करण्यात आलेल्या संविधान दीन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.

यावेळी खारेपाटण महाविद्यालय ते खारेपाटण बाजारपेठ ते बुद्धविहार पंचशील नगर, खारेपाटण अशी भव्य संविधान रॅली शालेय विद्यार्थी, एन सी सी स्टूडेंट शिक्षक व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आणि संविधान प्रेमी नागरिक यांच्या प्रमुख उपस्थित काढण्यात आली. यावेळी संविधान निर्माते व संविधान दिनाच्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी रॅलीत दिल्या.
खारेपाटण ग्रामपंचायत व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण तसेच पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दीन कार्यक्रम नुकताच खारेपाटण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राध्यापक गजानन व्हंकळी, प्राध्यापिका सौ. देसाई , एन. सी. सी. ५८ / महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग ओरोस विभागाचे नायक सुभेदार विनोद सिंह, हवालदार अमित कुमार, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, खजिनदार दीपक जाधव, बौद्धचार्य संतोष पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आकांक्षा पाटणकर, पूजा कदम, स्निग्धा पोमेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी खारेपाटण महाविद्यालय येथे सर्व विद्यार्थी व नागरिक यांच्या उपस्थित भारतीय संविधानाची उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर काढण्यात आलेल्या संयुक्तिक संविधान रॅलीचा समारोप खारेपाटण पंचशील नागर येथील बुद्धविहारात करण्यात आला. या रॅलीत शालेय विद्यार्थी, शिक्षक ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य कर्मचारी यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता.

खारेपाटण बुद्धविहार येथे झालेल्या संविधान दीन समारोप कार्यक्रमात पंचशील विकास मंडळ खारेपाटणच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी “भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असल्याचे सांगून ते राबविणारे लोक जर चांगले नसतील संविधान चांगले असून सुद्धा फायदा होणार नाही याकरिता संविधान त्यातील हक्क, अधिकार आणि कर्तव्ये घराघरात पोहचली पाहिजेत” असे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने खारेपाटण पंचशील नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष पाटणकर यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












