कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे गावचे सुपुत्र, उत्कृष्ट शरीरसौष्ठवपटू योगेश महिपत वायंगणकर यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी (ASI) पदोन्नती झाली आहे. याबद्दल त्यांचे तळेरे वासिय आणि मित्र मंडळी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रचंड मेहनत आणि अपार कष्ट करत त्यांनी गेली सोळा वर्षे त्यांनी मुंबई आणि गडचिरोली येथे सेवा बजावली असून सध्या मुंबई येथे कार्यरत आहेत. त्याचबरोबर ते एक उत्तम शरीरसौष्ठवपट्टू म्हणूनही त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह, राज्यभर तसेच मुंबई येथील विविध स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळविला आहे. शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या पिळदार शरीर यष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुंबई सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत यशही प्राप्त केलेले आहे. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा तळेरे नं. १ व माध्यमिक शिक्षण तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयामध्ये झाले असून त्यांच्या या पदोन्नतीमुळे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.











