खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील विविध आजारावर आयुर्वेदिक वनस्पतीद्वारे उपचार करणाऱ्या ठाणे येथील ‘युनिट्रेड रेमीडायस’ या संस्थेच्या वतीने खारेपाटण पंचशील नगर बुद्धविहार येथे नुकतेच आरोग्य विषयक आयुर्वेदिक उपचार पद्धती मार्गदर्शन शिबिर संघमित्रा महिला मंडळ खारेपाटणच्या अध्यक्षा संकिता संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी ठाणे येथील ‘युनिट्रेड रेमीडायस’ या संस्थेचे कार्यवाह राहुल जाधव व शिवराज मयेकर यांसह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे कार्यकर्ते संतोष मधुकर पाटणकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, संदीप पाटणकर, मकरंद पाटणकर, संघमित्र महिला मंडळाच्या सचिव आस्था पाटणकर, उपाध्यक्षा सायली तुरळकर, पूजा कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये पित्त, गॅस, डिबेटीज, बीपी, थायरॉईड, वजन कमी करणे, वजन वाढवणे, लहान मुलांच्या तक्रारी, वाताचे त्रास, मणक्याचे त्रास, गुडघ्याचे त्रास, मासिक पाळीच्या तक्रारी, हार्ट अटॅक, सर्प दंश, विंचू दंश आदी विविध आजारावर विस्तृत माहिती दिली. तर या आजारावर आयुर्वेदिक उपचार कसे घ्यावे याबद्दल ठाणे येथील ‘युनिट्रेड रेमीडायस’ या संस्थेचे राहुल जाधव व शिवराज मयेकर यांनी मार्गदर्शन करून माहिती दिली.











