एडस हा अत्यंत गंभीर व जीवघेणा आजार आहे – डॉ. यादव

फोंडाघाट महाविद्यालयात “एड्स प्रबोधन व जनजागृती कार्यक्रम” संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने “एड्स प्रबोधन व जनजागृती” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे तसेच समाजात एड्सबाबत चुकीच्या समजुती दूर करण्यात आल्या.कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.आर. यादव उपस्थित होते. मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स व HIV/AIDS संदर्भातील शास्त्रीय माहिती सोप्या पद्धतीने दिली. त्यांनी सांगितले की, एड्स हा अत्यंत गंभीर व जिवघेणा आजार असून, याबाबत सखोल माहिती असणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. त्यांनी HIV/AIDS म्हणजे नेमके काय, तो कसा होतो ? व कोणत्या चुकीच्या समजुतींमुळे लोकांमध्ये भीती पसरते, याबद्दल विद्यार्थी आणि युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.

तसेच संसर्ग कशामुळे होतो, कशामुळे होत नाही, उपलब्ध चाचण्या कोणत्या व निदानासाठी कोणत्या प्रमुख टेस्ट करणे आवश्यक आहेत, यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक भेदभाव, संसर्गाची शास्त्रीय साखळी, सुरक्षित जीवनशैली, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आरोग्यदायी वर्तन, या मुद्द्यांवर त्यांनी उदाहरणांसह संवाद साधला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी “प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर” या तत्त्वाचा पुनरुच्चार केला. NSS विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा .जगदीश राणे यांनी केले. शेवटी डॉ. बाजीराव डफळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!