मंदिराऐवजी वाचनालयासमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या पाहिजेत – डॉ.राज ताडेराव

फोंडाघाट महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमातील प्रमुख वक्ते डॉ. राज ताडेराव यांनी संविधानातील समतेचे तत्व हे केवळ कायदेशीर तरतूद नसून जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. “डॉ. बाबासाहेबांचा अभ्यास प्रचंड आणि व्यासंगी होता, त्यातून समाजात व्यापक सुधारणा झाल्या. ‘कसं जगावं आणि जगून काय करावं’ हे संविधान शिकवते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे संपूर्ण आयुष्य हे समता, वैज्ञानिक दृष्टी आणि सामाजिक ऐक्यासाठी केलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. त्यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या महामंत्राची आठवण करून देताना सांगितले की, “समता, न्याय आणि बंधुता ही तत्वे आपल्या लोकशाहीची पायाभरणी आहेत. महापरिनिर्वाण दिन म्हणजे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाचा विचार करण्याचा, समाजातील विषमता दूर करण्याचा आणि संविधानिक मूल्ये कृतीत आणण्याचा दिवस आहे.विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका बजावावी असे आवाहन केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त व भारतीय संविधानाच्या जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात संविधानाचे सामूहिक वाचन घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष रायबोले यांनी केले तर आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले आणि आयोजन ग्रंथपाल डॉ. विद्या मोदी यांनी केले.

.

error: Content is protected !!