नांदगाव (प्रतिनिधी) : ४ नोव्हेंबर रोजी नांदगाव येथील त्रिमूर्ती हॉटेलजवळ दुभाजकावर आढळलेल्या एका अनोळखी वयोवृद्ध पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसल्यामुळे, पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी हा अनोळखी इसम त्रिमुर्ती हॉटेल, नांदगाव येथे दुभाजकावर झोपलेला आढळून आला होता. त्या व्यक्तीला स्वतःचे नाव व पत्ता सांगता येत नव्हता. त्यामुळे त्याला सविता आश्रम, कुडाळ येथे दाखल करण्यात आले होते.आश्रमात असताना २६ नोव्हेंबर रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, ओरोस, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र,२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.
सविता आश्रम कुडाळचे समन्वय अधिकारी देवु रामचंद्र सावंत (५१) यांनी या घटनेची खबर पोलिसांना दिल्यानंतर अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ७० वर्षे असून, उंची सुमारे ५ फुट ५ इंच आहे. शरीर सडपातळ असून, डोक्यावर पांढरे व विरळ केस आहेत. रंगाने सावळा असून, पोटावर तीळ आहे.मृत्यूवेळी त्यांनी काळया-पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट, राखाडी हाफ बरमोडा आणि त्यामध्ये पांढरा हाफ डायफर असे कपडे परिधान केले होते. या अनोळखी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्वरित संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.












