पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्तक्षेपाने डायलिसिस तंत्रज्ञाची तात्काळ नियुक्ती
देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेवेत मोठी वाढ झाली असून CSR फंडातून मिळालेल्या दोन नव्या डायलिसिस मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालयातील एकूण मशीनची संख्या चार झाली आहे. वाढीव मशीनसाठी आवश्यक असलेला नवीन तंत्रज्ञही तत्काळ उपलब्ध होऊन रुजू झाला आहे. या सुविधेच्या विस्तारासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे तंत्रज्ञाची नियुक्ती अल्पावधीतच पूर्ण झाली.
याआधी देवगड ग्रामीण रुग्णालयात दोन मशीन कार्यरत होत्या. वाढलेल्या रुग्णभारामुळे कर्मचारी वर्गावर कामाचा ताण वाढत असल्याने रुग्णालय प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली होती. रुग्णालय समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी शासन स्तरावरून त्वरित तंत्रज्ञ उपलब्ध करून दिला असून, अन्य आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठीही सकारात्मक आश्वासन दिले आहे. सध्या देवगड परिसरात १९ रुग्ण डायलिसिससाठी प्रतीक्षेत आहेत. आता वाढलेल्या सुविधा आणि अतिरिक्त तंत्रज्ञामुळे रुग्णांना अधिक सुलभ, जलद आणि नियमित डायलिसिस सेवा मिळण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.












